*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
असावे असे हो, असावे तसे हो…
असावे असे हो, असावे तसे हो
सारेच करती फक्तच हो हो हो..
दुज्याच्या घरी डोकावू नये ते
आचरणात कधी ते न येते…
इथे लाव काडी तिथे लाव काडी
मनात खुपते दुज्याची ती माडी
आपले ते खरे दुज्याचे ते खोटे
दुस्वास करूनी कधी ते न भेटे…
भसाभस सोडू नये नळपाणी
दुज्यास सांगता आपण अडाणी
शहाजोग मोठा स्वत:ला समजे
चोरी करतांना जराही न लाजे…
सुतळीचा तोडा तो ही फुकटच
मुळी नाही लाज घेतांना हो लाच
मी नाही मी नाही तोंडच्याच वाफा
असे वाटते हो द्यावा एक लाफा…
फुकटचे खाऊ जिथे तिथे जाऊ
लग्न जाऊद्याहो जेवूनच घेऊ
तिकडे अक्षता इकडे ओरपती
लाज नाही लज्जा कशाची ना क्षिती..
नीतिनियमांचे वाजले हो बारा
फुकटचे खाया बरा आहे “ कारा”
पॅरोलवरती सुटून ते येती
दात काढती नि उजळ फिरती…
बासनात सारे नियम ते गेले
घरीदारी आता उसळती पेले
फॅशन आहे हो बायका नि पोरे
विलायतीने आता कपाट ते भरे…
बफे जेवणात ओसांडती ताटे
जणू काही यांना अन्न नाही भेटे
फुकटचे दाबा दोन दिवसांचे
पोट वाढते हो नऊ महिन्यांचे…
व्यायामाच्या नावे ठणाणा ठणाणा
काय सांगू राव, वेळंच भेटेना
सबबी किती त्या सांगती नानापरी
पाणी भरते हो तेथेच वैखरी…
काय आणि किती सांगावे हो आता
घरात ठणाणा मारतात बाता
असत्यास काहो भुलतात जन
गहाण ठेवती वाण्याकडे मन…
टेबलाखालून व्यवहार सारे
वरच्याची जरा भीती बाळगा रे
इथला हिशोब इथेच हो होतो
विव्हळत मग दाराशी बसतो…
कुणी नाही येत मदतीस तेव्हा
म्हणतात सारे, केले ते भोगा ना
चोख करा कर्म पाळा नेमधर्म
जगण्याचे आहे” हेच खरे मर्म”….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
