दोडामार्ग गांधी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांसोबत प्रयत्न करणार – माजी नगराध्यक्ष संतोष नानचे
शिवजयंती कार्यक्रमात श्री. नानचे यांच्या मागणीला मिळाले सर्वांचे अनुमोदन
तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात संपन्न
दोडामार्ग
स्वराज्य शिरोमणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आदर्श त्यांचे आचार विचार युद्ध नीती वैगरे बाबत येणाऱ्या पिढीला परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी त्यांच्या कार्याची ओळख अनेक स्वरूपात होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दोडामार्ग गांधी चौकात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी आपण सर्वांसोबत प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केले.
येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमावेळी श्री नानचे बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड सोनू गवस, सचिव उदय पास्ते, उपाध्यक्ष दिवाकर गवस, यांसह रंगनाथ गवस, वैभव इनामदार, गणेशप्रसाद गवस, डॉ. रामदास रेडकर, विजय चव्हाण, नीलम गवस, संदीप घाडी, धीरेन घाडी, राजेश नाईक, समीर सुतार, करण शेटकर, कल्पेश गवस, आर. एन. गवस, अरुण पवार आदी उपस्थित होते.
श्री नानचे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्यक्ष जीवनशैलीत आणणे ही काळाची गरज आहे. महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांची कार्यपद्धती, त्यांनी मिळविलेले विजय या सर्वांची माहिती येणाऱ्या पिढीला मिळणे आवश्यक आहे. दोडामार्गमधील येणाऱ्या पिढीला देखील शिवाजी महाराजांची ओळख व्हावी यासाठी येथील गांधी चौकात महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणे काळाची गरज असून आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न करूया असेही नानचे म्हणाले. ॲड. सोनू गवस यांनी दोडामार्गमधील नियोजित पुतळ्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पुतळा उभारणीसाठी तयारीला लागूया असे स्पष्ट केले. या कार्यक्रमात नियोजित पुतळ्यासाठी अनेकांनी देणग्या जाहीर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल दळवी यांनी केले तर प्रास्ताविक उदय पास्ते यांनी केले. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोवाडे, शिवगीत, यासह अनेक कार्यक्रम यावेळी ठिकठिकाणी साजरे करण्यात आले होते.