३० जानेवारीपासून कोल्हापुरात ‘दालन २०२६’ गृह व वास्तू प्रदर्शन
क्रेडाई कोल्हापूरतर्फे भव्य आयोजन; १७० स्टॉल्स, सर्व बुकिंग पूर्ण
कुडाळ
क्रेडाई कोल्हापूरच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित ‘दालन २०२६’ गृह व वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी कोल्हापुरात होणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देणारे हे भव्य प्रदर्शन सलग चार दिवस चालणार असल्याची माहिती आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला क्रेडाईचे पदाधिकारी शैलेंद्र अलमन, केतन शहा, पवन जामदार, सागर नालंग, गजानन कांदळगावकर, अभिजीत जैतापकर, अभय वालावलकर आदी उपस्थित होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूरचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, प्रफुल्ल तावरे (अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र) यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर तसेच विद्यानंद बेडेकर (उपाध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र) उपस्थित राहणार आहेत.
‘दालन २०२६’ या प्रदर्शनात एकूण १७० स्टॉल्सचा सहभाग असून, सर्व स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे. नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प, विविध बँकांचे गृहकर्ज विभाग तसेच आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाची माहिती ग्राहकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यानिमित्ताने क्रेडाईतर्फे विशेष स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी खंडपीठ कार्यान्वित झाल्यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दर वेगाने वाढत असून, सध्या गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे मत क्रेडाई सदस्यांनी व्यक्त केले.
विशेषतः वकील, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी कोल्हापुरात स्वतःचे घर घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
