सावंतवाडीत प्रशासनाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा…
सावंतवाडी
“माझा भारत, माझं मत, मी भारत आहे” या प्रेरणदायी संकल्पनेखाली आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, बँका आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अधिकारी व नागरिकांनी मतदानाची सामूहिक शपथ घेतली.
सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आयोजित मुख्य कार्यक्रमात मतदार नोंदणी अधिकारी समीर धारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून लोकशाही मजबूत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी नवीन मतदारांनी आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन करत “लोकशाहीचा आधार आमचे मतदान” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या मोहिमेद्वारे जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला.
