पिंपरी चिंचवड शहरासाठी ऐतिहासिक व अभिमानाचा क्षण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे रविवार, २५ जानेवारी रोजी लोकार्पण*
पुणे
पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या आणि सक्षम न्यायव्यवस्थेच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, शहराला आता स्वतःचे हक्काचे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय” लाभत आहे. या न्यायालयाचे भव्य लोकार्पण सोहळा रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी, सकाळी १०.३० वाजता, मोरवाडी येथील जुनी न्यायालयीन इमारत येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री.संदीप मारणे साहेब व श्री. आसिफ डॉक्टर साहेब यांच्या हस्ते तर पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश श्री. एम.के. महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक व लोकसंख्येच्या शहरासाठी स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची आवश्यकता दीर्घकाळापासून जाणवत होती. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे न्यायप्रक्रिया अधिक गतिमान, सुलभ व प्रभावी होणार असून, नागरिकांना वेळेत आणि सहज न्याय मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
ही केवळ प्रशासकीय घडामोड नसून, शहरातील सर्वसामान्य नागरिक, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी व संपूर्ण न्यायव्यवस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. न्यायालयीन कामकाजाचा वाढता भार लक्षात घेता, हे अतिरिक्त न्यायालय नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणारे आणि लोकाभिमुख न्यायव्यवस्थेचा आदर्श निर्माण करणारे ठरेल.
पिंपरी चिंचवड शहर हे राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक शहरांपैकी एक असून, येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक, फौजदारी, दिवाणी तसेच श्रमविषयक प्रकरणांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे न्यायालयीन कामकाजाचा ताण वाढत होता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना झाल्याने न्यायप्रक्रिया अधिक वेगवान, कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख होण्यास निश्चितच मदत होणार आहे.
या न्यायालयाच्या स्थापनेमुळे नागरिकांना न्यायासाठी पुणे न्यायालयात वारंवार जावे लागणार नाही, वेळेची आणि आर्थिक बचत होणार असून, न्यायप्रणालीवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल. तसेच वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी व संबंधित यंत्रणांसाठीही कामकाज अधिक सुसूत्रपणे पार पडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या न्यायालयाच्या स्थापनेसाठी सातत्याने प्रयत्न करणारे शहरातील सर्व लोकप्रतिनिधी, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, पोलीस प्रशासन, वकील बंधू-भगिनी तसेच जागरूक नागरिक यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच हा महत्त्वाचा टप्पा साकार झाला आहे.
प्रतिक्रिया- पिंपरी चिंचवड शहराच्या न्यायालयीन हक्कासाठीचा हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी व लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक व वकिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. – अॅड. उमेश राम खंदारे (सचिव, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन)
