बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघ भाजपसाठी बिनविरोध; संजना राणेंचा निर्विवाद विजय
कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अर्ज छाननीदरम्यान बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.
भाजपच्या उमेदवार संजना राणे यांनी आपल्या वकिलांमार्फत हरकत घेत विद्या शिंदे यांना २०१४ नंतर तीन अपत्ये झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या हरकतीचा विचार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विद्या शिंदे यांचा अर्ज अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला.
यामुळे बिडवाडी पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या संजना राणे या बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. या निर्णयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
बिडवाडी मतदारसंघातील या घडामोडीमुळे कणकवली तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
