६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या नेमबाजांची चमक; तीन खेळाडू भारतीय निवड चाचणीसाठी पात्र
सावंतवाडी
भोपाळ आणि दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील खेळाडूंनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिवम नरेंद्र चव्हाण, अवनी मेघश्याम भांगले आणि राजकुमारी संजय बगळे या तीन नेमबाजांची भारतीय निवड चाचणी संघासाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण १२ नेमबाजांची महाराष्ट्र संघातून निवड झाली होती, त्यापैकी या तीन खेळाडूंनी ट्रायल्समध्ये प्रवेश मिळवला आहे, तर सहा खेळाडूंनी ‘रिनॉन शूटर’ हा बहुमान मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. सावंतवाडीच्या शिवम चव्हाण याने १० मीटर एअर रायफल प्रकारात ६०७ गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंतवाडीच्या कु. अवनी मेघश्याम भांगले हिने एअर पिस्तूल प्रकारात ५३२ गुण, तर कुडाळच्या कु. राजकुमारी संजय बगळे हिने ५३० गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या तिन्ही खेळाडूंची निवड आता पुढील ट्रायल्ससाठी झाली असून, रायफल प्रकारातील चाचण्या पुणे येथे आणि पिस्तूल प्रकारातील चाचण्या दिल्ली येथे पार पडणार आहेत. या यशासोबतच जिल्ह्यातील सहा नेमबाजांनी ‘रिनॉन शूटर’ होण्याचा मान मिळविला. यामध्ये प्रतीक्षा प्रशांत सावंत हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात ५२४ गुण मिळविले. तसेच १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात परशुराम तिळाजी जाधव (५३५ गुण) आणि स्वामी समर्थ संजय बगळे (५२० गुण) यांनी चांगली कामगिरी केली. १० मीटर पीप साईट प्रकारात गौरव दत्तप्रसाद आजगावकर (६०३.४ गुण), हंसिका आनंद गावडे (६००.४ गुण) आणि निलराज निलेश सावंत (६०२ गुण) यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर रिनॉन शूटरचा दर्जा प्राप्त केला.
हे सर्व खेळाडू सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील उपरकर शूटिंग अकॅडेमीमध्ये प्रशिक्षक कांचन उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या खेळाडूंना नॅशनल रायफल असोसिएशनचे खजिनदार विक्रम भांगले यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
वरील संदर्भ घेऊन बातमीला योग्य हेडिंग द्या
