You are currently viewing मणेरीत भाजपची ताकद वाढली

मणेरीत भाजपची ताकद वाढली

सौ. सोनिया अंकुश उर्फ भैया नाईक / कुबल यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कार्यकर्त्यांत उत्साह

दोडामार्ग : मणेरी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मणेरी पंचायत समिती मतदारसंघासाठी सौ. सोनिया अंकुश उर्फ भैया नाईक / कुबल यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घोषणेमुळे मतदारसंघात भाजप समर्थकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, युवा नेते अंकुश उर्फ भैया नाईक, सुधीर दळवी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून आला.

युवा नेते अंकुश उर्फ भैया नाईक यांनी यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मणेरी व कोलझर या दोन्ही पंचायत समिती मतदारसंघांत भाजपाला भरीव मताधिक्य मिळवून दिले आहे. सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांत त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल मतदारांनी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मणेरी गावच्या कन्या असलेल्या सौ. सोनिया नाईक / कुबल यांचा महिला व युवती वर्गाशी मजबूत जनसंपर्क पक्षासाठी पूरक ठरणार आहे.

यापूर्वी गुरुनाथ नाईक यांनी दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्य करताना मणेरी मतदारसंघात अनेक विकासकामे मार्गी लावली होती. हाच समाजसेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजपकडून सौ. सोनिया अंकुश उर्फ भैया नाईक / कुबल यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले.

या उमेदवारीमुळे मणेरी पंचायत समिती मतदारसंघात भाजपाच्या विजयाबाबत आशादायी वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा