You are currently viewing विदाई

विदाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. शैलजा करोडे लिखित अप्रतिम कथा*

 

विदाई

——————————

” भरली , भरली , भरली मंगलघटिका भरली . तशी लग्न मंडपातील धावपळ वाढली . घोड्यावरून नवरदेव आला . त्याच्या स्वागताला वधुकडील मंडळी मंडपाच्या दाराशी मंगल कलश , पुजेचं ताट घेऊन उभी होती . आगत स्वागत झालं .

 

” वधूला आणा ” माझे काका म्हणाले , तसे मामांनी मला उचलून मंडपात आणले .

नवरदेवासह मला फुलांच्या राशिवर चालवत स्टेजवर आणले , डी जे वर गाणे वाजत होते ” बहारो फूल बरसाओ मेरा मेहबूब आया है ”

 

अंतरपाट धरला गेला व मंगलाष्टकं सुरू झाली .

 

: तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव । विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि ॥

 

या मंत्रोच्चाराबरोबर

गुरूजींनी दोन्ही हात वर नेले टाळी वाजवून वाजंत्रीला इशारा देण्यासाठी .अक्षतांची बरसात आमच्यावर होऊ लागली . आंतरपाट दूर झाला व मी वरमाला घालणार तोच अशोकला त्याच्या मित्रांनी वर उचलले . मी बावरले , आता कशी घालणार वरमाला . तोच माझा भाऊ व त्यांच्या मित्रांनी मलाही वर उचलले . मी आणखीनच गडबडले .मी वरमाला घालण्यासाठी वाकले , तोच अशोकच्या मित्रांनी त्याला मागे खेचले . या गडबड , गोंधळ , हसी मजाकमध्ये एकदाची मी अशोकच्या गळ्यात वरमाला घातली .

आम्हांला खाली उतरविले तसा मी निःश्वास सोडला . शालूचा पदर व शाल सावरत रूमालाने मी घर्मबिंदू टिपले . नजरेच्या कडेतून अशोक मला न्याहाळत होते , तशी नकळत मी ही लाजले . आरक्त गाल आणखी लाल झाले .

 

सप्तपदी , कन्यादान सगळे विधी पार पडले . जेवणावळी उठल्या . व प्रत्येक वधूला हळवा करणारा विदाईचा क्षणही आला .फुलांनी सजवलेली कार तयारच होती . आई बाबा , काका काकी , मामा मावशी माझ्या मैत्रिणी सगळ्यांचा निरोप घेऊन साश्रू नयनांनी मी लग्नमंडप ओलांडून  बाहेर आले .

 

कारजवळ भाऊ उभा आपले दोन्ही हात पसरवून , मी रडतच त्याच्या कुशीत शिरले .डोळ्यातील पाणी थांबवत भाऊने कारचा दरवाजा उघडला मला विदाई देण्यासाठी . ” ताई , तुला काय भेट देऊ मी .” ” अरे हा एवढा मोठा आनंद दिलास तू . मला लग्नाच्या बोहल्यावर चढवलंस . आणखी काय हवं आणि हे केवळ तुझ्यामुळे तर शक्य झालं , विद्येचं दान तू मला भरभरुन दिलंस ”

 

मी सासरी निघाले , हळूहळू निरोप देणारे हात मागे पडले अन मी भूतकाळात शिरले .

 

” सोनाली , ए पोरी प्रकाशचा डबा भरलास काय ? त्याची तयारी कर , आटप लवकर आणि शाळेला सोडून ये त्याला .सोनालीची आई रखमा बोलत होती .

 

” हो मी केलीय त्याची तयारी , नेते त्याला शाळेत ”

“अन हे बघ , शाळेतून लवकर घरी ये , इकडे तिकडे भरकटू नकोस , घरातलं सगळं आवर आणि शेवंता आजीने बोलावलंय , त्यांची मोलकरीण चार दिवस रजेवर आहे , त्यांची कामं करशील , चार पैसे मिळतील तर घरखर्चाला कामा येतील .चल मी निघते कामावर ”

 

प्रकाशचा हात धरून आम्ही दोघी भावंडं शाळेकडे चालू लागलो .

 

प्रकाशला सोडलं आणि माझी पावलं तिथंच थबकली . प्रार्थना सुरु होती

 

” खरा तो एकचि धर्म , जगाला प्रेम अर्पावे ” नकळत माझेही मन गुंतले.प्रार्थना संपवून मुले वर्गात केव्हा गेली मला कळलेही नाही .वर्गात गणिताचा तास सुरु झाला .आणि माझेही कुतूहल वाढले .मी वर्गाच्या खिडकीशी लपून तर मध्येच डोकावून गुरूजींनी शिकवलेले , ऐकत होते , पाहात होते .

 

” काय गं , सोनाली शेवंता आजीकडे इतक्या उशीरा का कामाला गेलीस ? कोठे होतीस तू ? ”

” काही नाही आई , घरातलं काम आवरलं नी गेली की त्यांच्याकडे ”

” खोटं नको बोलूस ? उद्या वेळेवर जा त्यांच्याकडे ” ” हो आई , जाईन मी वेळेवर ”

 

प्रकाशला शाळेत सोडले , पण आजही माझा पाय तेथून निघत नव्हता .आज इतिहासाचा तासात पानिपतचे तिसरे  युध्द शिकवले जात होते , मराठा साम्राज्य व अहमदशाह अब्दालीचे अफगाण सैन्यात हे युध्द झाले . या युद्धात मराठ्यांचा दारूण पराभव झाला व अहमदशाह अब्दाली विजयी झाला . पण त्याला फारसा लाभ झाला नाही व नरसंहारात त्याचेही सैन्य बरेच मारले गेले.

 

संध्याकाळी आई घरी परतली ती संतापातच . ” कार्टे कुठे भटकत असतेस ग . आज शेवंता आजीकडे गेलीच नाहीस म्हणत फाडकन माझ्या मुस्कटात मारली . मी कळवळले .प्रकाश माझा भाऊ मध्ये आला , नको आई , ताईला मारु नकोस , ताई माझ्यासाठी शाळेच्या आवारातच होती .” ” आवारात होती , तिथे काय करत होती ही ” ” आई , ताई माझ्या वर्गाच्या खिडकीतून अभ्यासाकडे लक्ष देत होती.तिलाही शिकायचंय आई , तिलाही येऊ दे ना शाळेत ” ” हिला शाळा शिकवू ? मग घरातल्या भाकरी कोण भाजणार ? तू ? का मी काम सोडून घरी बसू. मी घरी बसली तर तुम्ही खाणार काय ?हवा कि पाणी ?हवा खाऊन , पाणी पिऊन जगता आलं असतं ना तर काहीच कमवायची गरज नसती पडली रे . पण खायला तर कमीत कमी दोन टाईम तर लागतंच . महागाई या प्रकारची , एकट्या तुझ्या बापाच्या कमाईत काय भागतं .? पुढे हिचं लगीन पण करावं लागील ना , कोठून आणायचा एवढा पैसा? आता शिक्षण , पुढे लगीन . बस झाली तुझी बडबड . तुला शिकवतोय आम्ही हेच भाग्य समज . जास्त शहाणपणा करू नकोस . ‘ प्रकाश गप्प झाला .

 

रात्री झोपतांना माझा दुर्मुखलेला चेहरा पाहून प्रकाश म्हणाला , तू काळजी करू नकोस ताई , रोज शाळेत काय शिकवलं ते मी तुला शिकवत जाईन .दुपारी माझी शाळा सुटली कि मी तुला शिकवत जाईन . आई बाबा दुपारी कामावर गेलेले असतात . मी तुला घरकामातही मदत करीत जाईन .’ ” पण प्रकाश मला परीक्षा कशी देता येईल , माझा जर शाळा प्रवेशचं झाला नाही तर ” ” ताई परीक्षा नाही देता येणार , पण मी घरी आल्यावर प्रश्नपत्रिका सोडवत जा ना .म्हणजे तुला प्रश्नांचे स्वरूप कळत जाईल , परीक्षा , गुणांकन , निकाल या गोष्टी तुझ्यासाठी नाही घडल्यात तरी तुझं ज्ञान तर वाढेल .

 

मी अठराव्या वर्षात पदार्पण केलं तशी आई बाबांना माझ्या लग्नाची चिंता सतावू लागली .स्थळ पाहणी सुरु होती ,  , रुप रंग जरी असलं तरी माझ्याकडे शिक्षण नव्हतं . मध्यंतरीच्या स्त्री भ्रूण हत्येमुळे सगळ्याच समाजातील मुलींची संख्या घटली होती , त्यामुळे मुलींच्या बाबतीत हुंडा , मान पान , रूप रंग या बाबी गौण ठरू लागल्या . फक्त मुलगी द्या , खर्च आम्ही करू म्हणणारी मंडळींचे प्रमाण वाढले होते .

 

अशोक चे स्थळ माझ्यासाठी सांगून आले .पण माझ्याकडे रूप रंग असले तरी शिक्षण नव्हते . अशोक शिक्षित व आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर होता . मुलगी फार शिकलेली नसली तरी त्याला अशिक्षित नको होती . रूपाने देखणा उंचपुरा , अशोक मलाही भावला होता , पण माझं शिक्षणचं आडवं येत होतं .

 

बैठकीत मंडळी बसली होती . ” मुलगी पसंत आहे , पण शिक्षण नाही , फार नाही पण नवर्‍याला व्यवसायात मदत होईल एवढं शिक्षण हवं होतं ” ‘ नमस्कार , मी तुम्हां सगळ्यांमध्ये लहान आहे तरी बोलण्याचं धाडस करतोय . माझी बहीण अशिक्षित नाही , तिला सगळं लिहिता वाचता येतं ,हवं तर यावर्षी दहावीच्या परिक्षेला बहिःस्थ विद्यार्थिनी म्हणून फाॅर्म भरावा , ती नक्कीच पास होईल याची मी गॅरंटी घेतो , व लगेच पुढच्या वर्षी बारावीचीही परीक्षा देईल .”प्रकाश बोलत होता .

 

” मग हरकत नाही. मुलीचं शिक्षण होईल व तोपर्यंत ती 21 वर्षांचीही होईल .चालेल आम्हांला ”

आणि आज प्रकाशने माझी विदाई केली होती . त्याच्यामुळेच तर मला शिक्षणाचं अनमोल रत्न मिळालं व अशोकसारखं सोनं लाभलं . तरी माझा भोळा भाऊ म्हणतो ताई तुला मी काय भेट देऊ ”

 

सनईचे सूर वाजू लागले . स्वागताला सवाष्णी आल्या , तशी माझी तंद्री भंग पावली . ” ये सुनबाई , पहिला उजवा पाय टाक ” म्हणत कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांनी माझा गृहप्रवेश केला , व मी एका नव जीवनाला सुरूवात केली .

——————————————

शैलजा करोडे ©®

नेरुळ नवी मुंबई

मो.9764808391

प्रतिक्रिया व्यक्त करा