*विद्यार्थ्यांनी भविष्याची दिशा निश्चित करावी – लखमराजे भोंसले*
*दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तळवडे येथील व्याख्यानमालेचे उद्घाटन उत्साहात*
सावंतवाडी
विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची दिशा आताच निश्चित करावी. आपल्याला दहावी व बारावीनंतर पुढे काय करायचे आहे? शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडायचे आहे? हे आताच निश्चित करावे. आता करिअरच्या दृष्टीने अनेक क्षेत्रे उपलब्ध आहेत. आज तंत्रज्ञानामध्ये रोज नित्य नवीन बदल होत असताना विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्यावत करणे अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त तथा सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित तळवडे जनता विद्यालय व सावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तळवडे शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष कै.अण्णासाहेब तथा मधुकरराव बुगडे यांच्या स्मरणार्थ दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन स्तरावरील प्राध्यापकांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून श्री सावंत भोंसले हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर, संचालक सुरेश गावडे, रवींद्र परब, प्रा. दिलीप गोडकर जन शिक्षण संस्थांचे गजानन गावडे, पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. गणेश मर्गज, इंग्रजी विभागाचे प्रा. विजय राठोड, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश पावणोजी, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर, कै. अण्णासाहेब बुगडे यांच्या स्नुषा सौ. नेहा बुगडे पुतणी कु. पूजा विजय बुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री लखम सावंत भोसले यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तसेच कै. अण्णासाहेब बुगडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. त्यावेळी लखमराजे भोंसले यांचा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना श्री सावंत भोंसले म्हणाले राजघराण्याचे व या शिक्षण संस्थेचे फार जुने ऋणानुबंध आहेत या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो. शिक्षण क्षेत्रात आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शिक्षणाचा दर्जा टिकवण्याची स्पर्धा वाढली आहे. शिक्षण संस्था चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शन मिळावे हा विचार करून व्याख्यानमालेचे आयोजन संस्थेने केले आहे. हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
यावेळी बोलताना प्रा. दिलीप गोडकर म्हणाले कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांची व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरून विद्यार्थी भविष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास हेच संस्थेचे ध्येय आहे. शिक्षकांचे विषयज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्याची मनिषा आहे. संस्था चालक, शिक्षक, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व पालक यांच्या संपूर्ण संयोगातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात फळ महोत्सव हा विद्यालयाचा एक विशेष उपक्रम राबवण्याचा मनोदय असल्याचे श्री गोडकर म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक दयानंद बांगर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक प्रसाद आडेलकर यांनी केले. त्यानंतर डॉ. गणेश मर्गज यांचे ‘प्राणी वर्गीकरण’ या विषयावर तर इंग्रजी विभागाचे प्रा. विजय राठोड यांचे बोर्ड परीक्षा या विषयावर मार्गदर्शन झाले.
