तेंडोली–पिंगुळी मतदारसंघ भाजपला सोडण्याचा निर्णय अमान्य; पक्षांतर्गत दुर्लक्ष आणि मानसिक त्रासामुळे पाऊल – वर्षा कुडाळकर
कुडाळ :
शिवसेनेच्या माजी महिला जिल्हाप्रमुख आणि ओबीसी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत पक्षातील प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पिंगुळी आणि तेंडोली मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले असतानाही ते भाजपला सोडण्याचा निर्णय आणि पक्षांतर्गत वाढलेली घुसमट यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी जिल्हा परिषद निवडणूक आपण तेंडोली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा त्यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पत्रकार परिषदेत बोलताना वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाली तेव्हा कुडाळ तालुक्यातील ७८ गावांमधील त्या एकमेव महिला पदाधिकारी होत्या. या काळात त्यांनी उपविभाग प्रमुख, तालुका आणि उपजिल्हाप्रमुख अशी विविध पदे भूषवली. जिल्ह्याची जबाबदारी मिळाल्यानंतर कुडाळ, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या पाचही तालुक्यांत संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.
मात्र सध्याच्या परिस्थितीत पक्षात काम करण्यासाठी वाव मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्या म्हणाल्या की, संघटना वाढीसाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये त्यांना विचारात घेतले जात नाही. स्थानिक पातळीवर काम करताना सतत मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घ्यावा लागला.
पालकमंत्री नितेश राणे यांच्याबाबत बोलताना वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आणि सार्थ अभिमान आहे; मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून होणारी घुसमट असह्य झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
राजीनाम्याची मुख्य कारणे स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, तेंडोली आणि पिंगुळी हे शिवसेनेचे हक्काचे मतदारसंघ असतानाही ते भाजपला सोडण्याचा जो निवडणूक फॉर्म्युला ठरवण्यात आला, तो आपल्याला मान्य नाही. त्यामुळेच शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि ओबीसी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आला आहे.
या वेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात साथ देणाऱ्या सीताराम चव्हाण, श्री. गडकरी, श्री. गुरव, श्री. साळसकर, बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर, नीलम शिंदे, सरिता राऊत तसेच सर्व तालुकाप्रमुख व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, आपण कोणत्याही इतर पक्षात प्रवेश करणार नसून, तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय कायम आहे.
