महावितरण कडून सहकार्याचे आवाहन
कणकवली
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी मार्च अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. गोविंद बोडके (भाप्रसे) यांनी दिले आहेत.
त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागातील भांडुप, कल्याण, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग व जळगाव परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शुक्रवार, शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कार्यवाही सुटीच्या दिवशी सुरु ठेवण्याचे निर्देश सहव्यवस्थापकीय संचालक श्री. बोडके यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कोकण प्रादेशिक विभागात थकीत वीजबिल वसुलीसाठीची कार्यवाही मार्च अखेरपर्यंत सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल अँप (App), www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.