You are currently viewing सिंधुदुर्ग जि.प. निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर

सिंधुदुर्ग जि.प. निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर

अध्यक्षपद ३ वर्षे भाजपकडे, २ वर्षे शिवसेनेकडे; ५० पैकी भाजप ३१ तर सेना १९ जागांवर लढणार

विधानसभा मतदारसंघनिहाय जागावाटपावर शिक्कामोर्तब; प्रचार रणधुमाळीला सुरुवात

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीचा अंतिम जागावाटप फॉर्म्युला निश्चित झाला असून याबाबतची अधिकृत माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तीन वर्षे भाजप आणि दोन वर्षे शिवसेना असे सूत्र ठरले असून, यावरून जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व कायम असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

ओम गणेश निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी सांगितले की, कोणताही वाद न होता युतीचे जागावाटप अंतिम झाले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनाही काही जागा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपनेते संजय आंग्रे, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप ३१ जागांवर तर शिवसेना १९ जागांवर निवडणूक लढवणार आहे. पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप ६३ तर शिवसेना ३७ जागांवर उमेदवार देणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय जागावाटप

सावंतवाडी :

भाजप : जि.प. ११, प.स. १७

शिवसेना : जि.प. ६, प.स. १७

कुडाळ :

भाजप : जि.प. ४, प.स. १५

शिवसेना : जि.प. ११, प.स. १५

कणकवली :

भाजप : जि.प. १६, प.स. ३१

शिवसेना : जि.प. २, प.स. ५

या जागावाटपामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून महायुतीचे कार्यकर्ते आता थेट प्रचाराच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा