मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे डांबरीकरण अखेर सुरू
नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे नगरपरिषद प्रशासन जागे
सावंतवाडी
शहरातील मुख्य बाजारपेठेत नळपाणी लाईनसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याचे डांबरीकरण आज सकाळपासून सुरू झाले आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाला अखेर हालचाल करावी लागली.
नळपाणी पुरवठा योजनेसाठी मुख्य बाजारपेठेतील रस्ते खोदण्यात आले होते. मात्र काम पूर्ण होऊन दहा दिवस उलटूनही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नव्हते. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांवरच वेळकाढूपणा सुरू असल्याने व्यापारी व रहिवाशांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी तात्काळ डांबरीकरण न झाल्यास माती व खडी नगरपरिषदेच्या दारात नेऊन टाकण्याचा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्यानंतर नगरपरिषदेचा बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून आज सकाळपासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
डांबरीकरण सुरू झाल्याने परिसरातील व्यापारी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
