सावंतवाडी बाहेरचावाडा येथे घराच्या टेरेसवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत
सावंतवाडी :
घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या ५२ वर्षीय महिलेचा पाय घसरून खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सावंतवाडीतील बाहेरचावाडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तबसुम आरिफ शेख (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तबसुम शेख या शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुमजली घराच्या टेरेसवर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी टेरेसवरील फरशीवरून त्यांचा पाय अचानक घसरला आणि त्या थेट खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सावंतवाडी शहरातील डॉ. स्वार यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेबाबत शफीक आदमसाब खान (रा. भटवाडी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
