कणकवली पंचायत समितीचा “माझी शाळा.. माझा किल्ला उपक्रम”
कणकवली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमी स्मृतींना उजाळा देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व कौशल्याला वाव मिळावा आणि महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेले किल्ले, त्यातील स्थापत्य कलेचे महत्त्व त्यांना समजावे, या वास्तूंचे जतन व संवर्धन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने पंचायत समिती कणकवलीच्या वतीने शिवजयंती 2021 निमित्त ” माझी शाळा- माझा किल्ला ” या विशेष उपक्रमाचे दिनांक 10 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत कणकवली तालुकास्तरीय ” सह्याद्रीचे छोटे मावळे – किल्ले बनवा स्पर्धा २०२१ ” चे आयोजन केले आहे.
या स्पर्धेला तालुक्यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला जात आहे. सर्व बच्चे कंपनी किल्ले बनवण्यामध्ये दंग आहे.. या छोट्या मावळ्यांच्या मनातील किल्ला दगड, माती त्याचबरोबर इतर साहित्याच्या मदतीने त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकांच्या सहकार्याने साकारला जात आहे.. हा किल्ला बनवत असताना किल्ल्यांचे प्रकार, शिवरायांचं किल्ल्यावरील व्यवस्थापन, किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तूंची स्थापत्य कला, प्रत्येक किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व याचा कृतिशील अनुभव विद्यार्थी घेत आहेत. संपूर्ण तालुक्यामध्ये “किल्ले शाळाशाळांत ..शिवराय मनामनात” च्या जयघोषाने शिवरायांच्या विचारांचा जागर सुरू आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कृतिशील शिक्षणाचे धडे अगदी बालवयातच मिळत आहेत यातूनच महाराष्ट्राचे वारसा असणारे हे गडकिल्ले यांचे संवर्धन आणि जनजागृती होण्यास निश्चितच मदत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पं स सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये सुरू आहे.