You are currently viewing २२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

२२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

२२ वर्षांची निष्ठा संपुष्टात

भाजप मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकरांचा राजीनामा

मालवण :

गेली तब्बल २२ वर्षे भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटन वाढीसाठी काम करणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आज आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिला. जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या निर्णयांमुळे, अकार्यक्षमतेमुळे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मालवण नगरपालिकेत भाजपचा पराभव झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोंडकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. युवक अवस्थेत भाजप नेते विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाशी जोडले गेलो, असे सांगत त्यांनी नारायण राणे आणि महायुतीचे निलेश राणे यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचे नमूद केले. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांत मालवण शहर आणि देवबाग जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता, असेही त्यांनी सांगितले.

मात्र नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी जिल्हा नेतृत्वाने अनुभवी व निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून समांतर यंत्रणेला प्राधान्य दिले. अनेक वर्षे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारण्यात आले. मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युतीबाबत संभ्रम निर्माण करत आधी युती नाकारली व नंतर कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, ज्याचा फटका भाजपला बसला, असा आरोप मोंडकर यांनी केला.

संघटनेतील प्रश्नांवर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना “पटत नसेल तर राजीनामा द्या” अशी उत्तरे मिळाल्याचे सांगत, केवळ निवडणुकीपुरता कार्यकर्त्यांचा वापर करण्याची भूमिका असह्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजप पहिल्या क्रमांकावर असतानाही मालवणमध्ये पक्षाची पीछेहाट ही जिल्हा नेतृत्वाच्या चुकीच्या गणितामुळेच झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
२२ वर्षे ज्या परिवारासाठी कष्ट घेतले त्या पक्षातून बाहेर पडणे वेदनादायी असले, तरी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा