भाजप–शिवसेनेत रस्सीखेच; आयत्यावेळी डावपेच बदलणार का?
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी होणारी निवडणूक सध्या चांगलीच रंगतदार ठरत आहे. भाजपकडून अनिल निरवडेकर यांचे नाव जवळपास अंतिम मानले जात असताना, शिवसेनेकडून आयत्यावेळी खेळी खेळली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या ठिकाणी शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांना उपनगराध्यक्षपदासाठी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या संदर्भात शिवसेनेच्या अधिकृत सूत्रांकडून माहिती देण्यात आली असून, संख्याबळ कमी असले तरी आयत्यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब नेमका कोणता करिश्मा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार असून, या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. संख्याबळ भाजपकडे अधिक असल्याने, स्वीकृत नगरसेवक पदासाठी सिद्धांत भांबरे आणि उपनगराध्यक्षपदासाठी अनिल निरवडेकर यांची नावे जवळपास फायनल मानली जात आहेत.
मात्र, या संपूर्ण घडामोडीत शिवसेनेकडून निवडणुकीपूर्वी आयत्यावेळी अजय गोंदावळे यांचे नाव पुढे करण्यात आले असून, ते अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संजू परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नेमकी पुढील रणनिती काय असणार, आणि उपनगराध्यक्षपदासाठी कोणता उमेदवार फिल्डिंगला उतरणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
उद्या दुपारपर्यंत सावंतवाडीच्या उपनगराध्यक्षपदाचा चेहरा स्पष्ट होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
