मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते आणि साने गुरुजी कथामाला मालवणचे विद्यमान अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर (ठाकूर गुरुजी) यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा केंद्रीय बालसेवा पुरस्कार नुकताच बेळगाव येथे सपत्नीक प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मुंबई आणि दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव (कर्नाटक) यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे लोकनेते प्रा. एन.डी. पाटील कथानगरीत कथामालेचे अमृत महोत्सवी अधिवेशन नुकतेच संपन्न झाले.
ठाकूर यांच्या गेल्या ५५ वर्षाच्या बालसेवेच्या कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार अधिवेशन उद्घाटनप्रसंगी हसन देसाई (केंद्रीय अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मुंबई) आणि आकाश शंकरराव चौगुले (आय आर एस अप्पर आयुक्त जी.एस.टी. बेळगाव) या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रुपये ११००० रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी व्यासपीठावरडॉ.प्रा.आनंद मेणसे (थोर विचारवंत आणि साहित्यिक बेळगाव) लालासाहेब पाटील (विश्वस्त केंद्रीय कथामाला) राजाराम विठ्ठलराव पाटील (अध्यक्ष दक्षिण महाराष्ट्र शिक्षणमंडळ बेळगाव) बाबुराव पाटील (कार्याध्यक्ष कथामाला) सुनील पुजारी (प्रमुख कार्यवाह कथामाला) गजानन कोटेवार (प्रमुख संघटक कथामाला) आदी कथामाला पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी लालासाहेब पाटील यांनी ठाकूर यांच्या ५५ वर्षाच्या कथामाला कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले,” ठाकूर यांचे व्यक्तिमत्व कथामाला संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या मुशीत तयार झालेले आहे. त्यांचे कार्य अभिजात आहे एवढे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना ठाकूर गुरुजी म्हणाले, “हा माझा एकट्याचा सत्कार नसून माझ्यावर प्रारंभी कथामालेचे संस्कार करणारी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण ही संस्था, तेथे चालणारी कथामाला तिचे आधारस्तंभ मधु वालावलकर, ज्ञानेश देऊलकर, श्रीपाद तोंडवळकर यांचा आहे.
तसेच माझ्यावर कथामालेचे संस्कार करणारे कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर, कथामाला मासिकाचे संपादक आदरणीय मधुभाई नाशिककर, कथामाला सेवाभावी कार्यकर्ते राजाभाऊ मंगळवेढेकर, प्र.दी.पुराणिक, चंद्रकांत पाडगावकर, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, प्रा. राम शेवाळकर, थोर विभूती नरूभाऊ लिमये, शिरुभाऊ लिमये आदी बुजुर्गांचा हा सत्कार आहे.
माझ्यावर कथा निवेदनाचे संस्कार ‘कथाकथन प्रबोधिनी पुणे’ येथील प्रा. ग म केळकर, द्वारकानाथ लेले, अनिल गोडबोले, मुकुंद तेलीचरी यांनी बिंबविले यांचा हा सत्कार आहे. यापैकी एकही विभूती आज देहरूपाने उपस्थित नसली तरी त्यांच्या पवित्र स्मृतींना मी माझा बालसेवा पुरस्कार अर्पण करतो”.
यानंतर विविध परिसंवाद आणि मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी गोवा कथामालेला आदर्श कथामाला पुरस्कार आणि राजन तांबे (वरळी, मुंबई) यांना आदर्श कथानिवेदक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वांचे आभार सुनील पुजारी यांनी मानले.
यावेळी गोवा, बेळगाव, पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, माजलगाव, बीड, पालघर आदी अनेक ठिकाणाहून बहुसंख्येने कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.
