मालवण पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकर यांची बिनविरोध निवड
सभागृहात महायुतीचे शक्तीप्रदर्शन
मालवण
मालवण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेचे दीपक पाटकर यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. याच वेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर (शिंदे शिवसेना) आणि मच्छीमार नेते रविकिरण तोरसकर (भाजप) यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्यक्षपदासाठी दीपक पाटकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जाला गटनेत्या पुनम चव्हाण यांनी सूचक, तर सहदेव बापर्डेकर यांनी अनुमोदन दिले. अन्य कोणताही अर्ज न आल्याने निवड बिनविरोध झाली.
निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेले शिंदे शिवसेना व भाजपचे नगरसेवक यावेळी महायुती म्हणून सभागृहात एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. उपनगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करताना दोन्ही पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे आगामी काळात पालिकेचा कारभार महायुतीच्या माध्यमातून चालणार असल्याचे स्पष्ट झाले असून विषय समित्यांच्या निवडीत भाजपला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यानंतर झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी प्रशासनावर विविध मुद्द्यांवर टीका केली. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी प्रशासकीय काळातील कचरा व्यवस्थापनाच्या कामांची व बिलांची चौकशी करण्याची मागणी केली. मंदार केणी यांनी मंजूर विकासकामांची सद्यस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली, तर तपस्वी मयेकर यांनी सभागृहाचे कामकाज ऑनलाइन करण्याची सूचना मांडली. महेंद्र म्हाडगुत यांनी नगरसेवकांना आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
निवडीनंतर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे अभिनंदन केले. मात्र या कार्यक्रमाला भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
शहराच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगत नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची जबाबदारी अधोरेखित केली. तर, सर्वांना सोबत घेऊन शहराच्या प्रलंबित प्रश्नांवर भर दिला जाईल, असे नवनियुक्त उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सांगितले.
