You are currently viewing दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य

कोकण विभागातील ४० टक्के केंद्रांवर व्यवस्था पूर्ण

सिंधुदुर्गनगरी —

गैरप्रकारमुक्त, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात दहावी व बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कठोर उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार कोकण विभागातील सर्व परीक्षा केंद्रांवरील परीक्षेशी संबंधित प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोकण विभागातील एकूण १७५ परीक्षा केंद्रांपैकी आतापर्यंत ७० केंद्रांवरील (सुमारे ४० टक्के) सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
उर्वरित १०५ परीक्षा केंद्रांच्या संस्थाचालक व प्राचार्यांच्या बैठका घेऊन पुढील दहा दिवसांत कॅमेरे बसवण्याच्या सूचना विभागीय मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. शासन निर्णय दिनांक १३ मे २०२५ व राज्यमंडळाच्या ९ डिसेंबरच्या पत्रानुसार फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वी परीक्षांसाठी ही अट बंधनकारक आहे. बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हींची तपासणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून सुरू असून फूटेज जतन करून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान, तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत. दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान, तर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. बारावीचे हॉलतिकीट १२ जानेवारीपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कोकण विभागात एकूण १७५ परीक्षा केंद्रे असून त्यापैकी दहावीची ११४ व बारावीची ६१ केंद्रे आहेत. परीक्षेसाठी ३,०४० वर्गखोल्यांची आवश्यकता असून आतापर्यंत १,७१२ खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित १,३२८ खोल्यांमध्ये तातडीने कॅमेरे बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार असून अशा केंद्रांवरील सीसीटीव्हीचे ऑनलाईन फुटेज जिल्हाधिकारी व जिल्हा दक्षता समितीकडे उपलब्ध करून दिले जाणार आहे. परीक्षा नियंत्रणासाठी राज्यमंडळ व विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे.
परीक्षेतील पारदर्शकता राखण्यासाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व कर्मचारी यांची अदलाबदल करण्यात येणार असून संबंधित केंद्राबाहेरील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांना निर्देश देण्यात आले आहेत.
१० जानेवारीअखेर कोकण विभागात दहावीचे २५,७४८ तर बारावीचे २३,९९४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत बारावीसाठी २१ जानेवारी व दहावीसाठी ३० जानेवारीपर्यंत (अतिविलंब शुल्कासह) आहे.
बोर्ड परीक्षा सुरळीत व नियोजनबद्ध व्हाव्यात यासाठी विभागीय मंडळाने “बोर्ड परीक्षेचा राजमार्ग : सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे” ही नाविन्यपूर्ण पुस्तिका प्रकाशित केली आहे. तसेच पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, नामांकित व्यक्ती यांच्या माध्यमातून कॉपीमुक्त परीक्षेसाठी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली. परीक्षांची सर्वसमावेशक तयारी सुरू असून शाळा स्तरावरील तयारीची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा