वेंगुर्ला :
“गुरूवर्य महान साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. त्यामुळेच मराठी भाषेला भारतीय भाषांमध्ये एक वेगळा आयाम प्राप्त झाला. एक प्रतिष्ठा मिळाली.वि. स. खांडेकरांच्या लेखणीने वाङ्मय प्रकाराच्या सर्व दालनातून मुक्तपणे संचार केला. भारतीय अनेक भाषांमधून त्यांच्या साहित्याची भाषांतरे झाली. भारतीय रसिक वाचकाला ते नेहमी आपलेच वाटले. त्यानी आपल्या साहित्यातून सकारात्मक विचार सांगितले. माणूस आणि मानवता यावर अपार प्रेम करणारे ते लेखक होते.
अशा महान साहित्यिकाच्या जीवनातील लेखन प्रवासाची सुरूवात आपल्या भूमीत झालेली आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपण अशा तेजस्वी विचाराचे वारसदार आहोत. हा अमूल्य ठेवा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी असे कार्यक्रम आयोजित करून चर्चा, विचारांची देवाण घेवाण होणे हे आजच्या भोवतालच्या अस्वस्थ परिस्थितीत गरजेचे आहे. ” असे प्रतिपादन आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष लेखिका वृंदा कांबळी यानी केले.
आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या वतीने वि. स. खांडेकर याच्या जयंतीनिमित्त शिरोडा येथील वि. स. खांडेकर स्मारकाच्या सानिध्यात त्यांच्या प्रा. पांडुरंग कौलापुरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. वि. स. खांडेकर यांच्या प्रतिमेला हार घालून प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डाॅक्टर संजीव लिंगवत यानी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सौ. विशाखा वेंगुर्लेकर यानी वि. स. खांडेकरांच्या साहित्यावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
सुधाकर ठाकूर यानी वि. स. खांडेकर यांच्या साहित्यावर काव्यात्मक विचार मांडून उपस्थितांना अंतर्मुख केले. प्रा. सुरेखा देशपांडे यानी वि. स. खांडेकर यांच्या साहित्यातील महत्वाच्या उतार्यांचे अंशात्मक वाचन केले.स्वप्निल वेंगुर्लेकर यानी वि. स. खांडेकर यांच्या दोन कवितांचे वाचन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. पि. एस. कौलापुरे सर यानी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. वि. स. खांडेकर यांचे साहित्य प्रेरक असल्याचे सांगितले.
वि. स. खांडेकर यांच्यासारख्या महान साहित्यिकांचा वावर ज्या वास्तूत होता त्या वास्तूत येऊन भारावून जायला झाले अशा प्रतिक्रिया आनंदयात्रिनी व्यक्त केल्या. सौ. विद्या कौलापुरे यानी सूत्रसंचालन केले. आभार स्वप्निल वेंगुर्लेकर यानी मानले. सत्यम गडेकर, स्वप्निल वेंगुर्लेकर, विशाल उगवेकर ,शिपाई काका यादव यानी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
भाऊ केरकर, योगीश कुलकर्णी, जान्हवी कांबळी, महेश बोवलेकर, राजकुमार शिंगाडे, सोमा गावडे, मेहंदी बोवलेकर, मीरा ठाकूर, सीताराम टाककर, इत्यादी साहित्यप्रेमी उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम झाला.
