साटेली थोरलेभरड–सज्जनवाडीतील दोन रस्त्यांचे भूमिपूजन उत्साहात; ग्रामस्थांना मोठा दिलासा
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील साटेली थोरलेभरड–सज्जनवाडी परिसरातील आमदार निधीतून मंजूर झालेल्या दोन रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाला भगवान गवस, संजय गवस, रामदास मेस्त्री, लाडू आयनोडकर, संतोष शेटये, साटेली–भेडशी उपसरपंच डिंगणेकर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यात रस्त्यांवर होणारा चिखल, खड्डे आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांमुळे नागरिकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार दीपकभाई केसरकर यांनी तातडीने निधी मंजूर करून रस्त्यांच्या कामास मान्यता दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी लागली आहे.
रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होणार असून वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. भूमिपूजनप्रसंगी बोलताना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊनच ही कामे मंजूर करण्यात आल्याचे सांगत, आगामी काळातही दोडामार्ग तालुक्यात विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
या रस्त्यांमुळे साटेली थोरलेभरड–सज्जनवाडीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार असून परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
