You are currently viewing दिव्यांगांच्या कल्याणासाठी नगरपालिका कटिबद्ध : ममता वराडकर

दिव्यांगांच्या कल्याणासाठी नगरपालिका कटिबद्ध : ममता वराडकर

दिव्यांगांच्या कल्याणासाठी नगरपालिका कटिबद्ध : ममता वराडकर

मालवण

नगर विकास विभागाच्या मार्गदर्शक तत्वावर दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मालवण नगरपालिकेमार्फत लवकरच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतील असे आश्वासन मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिले. मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगण मध्ये महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने अंध दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबी जीवनासाठी आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी श्रीमती वराडकर बोलत होत्या. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे,दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे निवृत्त महाव्यवस्थापक नंदकुमार फुले, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे कोकण विभागाचे अध्यक्ष बाबुराव गावडे,कार्यशाळा समन्वयक स्वागत थोरात,सहाय्यक प्रशिक्षक स्वरुपा देशपांडे व रेवा कदम यांचेसह कार्यशाळेतील सहभागी अंध दिव्यांग व डोळस प्रशिक्षणार्थी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

मालवणचे बॅ.नाथ पै सेवांगण व लायन्स क्लब, मालवण यांच्या सहकाऱ्याने अंध आणि डोळस व्यक्तींसाठी दोन दिवस ही कार्यशाळा निवासी आहे.या कार्यशाळे अंतर्गत अंध दिव्यांग व्यक्तींसाठीच्या पांढऱ्या काठीची ओळख तसेच शास्त्रीय पद्धतीने या काठीचा उपयोग कसा करावा याचे प्रशिक्षण देऊन सराव करुन घेतला जाणार आहे. आपल्या ज्ञानेन्द्रियांचा परिपूर्ण उपयोग कसा करावा, गंध व स्पर्शाच्या ज्ञानाने धान्य ओळखणे,दिशांची ओळख,विविध आवाजांची ओळख, स्नायूंची लवचिकता टिकवण्यासाठीचे सोपे व्यायाम व स्मरणशक्ती वाढवणाऱ्या खेळांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात लुई ब्रेल यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. स्वागत थोरात यांनी प्रास्ताविक केले.अनिल शिंगाडे यांनी सूत्रसंचालन केले.महिला राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट खेळाडू शिल्पा गावकर यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे अनौपचारिक आभार मानले. कार्यशाळेचे यशस्वी संयोजन करण्यासाठी विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, अरविंद आळवे, प्रकाश वाघ, रंजना इंदुलकर यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा