अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत ‘एम एस धोनी’ चित्रपटात झळकलेल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केली. अभिनेता संदीप नाहर याने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं. आत्महत्येपूर्वी संदीपने पत्नी आणि सासूच्या स्वभावदोषाकडे बोट दाखवलं होतं. त्यानंतर सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक झाले आहेत.
अभिनेता संदीप नाहरने एमएस धोनी, केसरी यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. काल संध्याकाळी फेसबुकवर आपली व्यथा पोस्ट आणि व्हिडीओच्या माध्यमातून मांडत संदीपने जीवन संपवलं. संदीपचे मित्र, कुटुंबीय आणि चाहत्यांनी त्याला फोन करुन अडवण्याचाही व्यर्थ प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याने जगाचा निरोप घेतला होता. ही पोस्ट नंतर फेसबुकवर हटवण्यात आली आहे. संदीपने पत्नीला आत्महत्येस जबाबदार ठरवू नये, असं स्पष्ट म्हटलं आहे.