*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित पुस्तक काव्यरचना*
*झुळूक*
पहाटेची गुलाबी थंडी
अन् मंद झुळूक वाऱ्याची
अंगात भरणारी हुडहुडी
झलक घसरल्या पाऱ्याची
शुभ्रधवल धुक्याची सय
दाटी करते क्षणाक्षणाला
हळुवार झुळूक येताक्षणी
अलगद बिलगते पानाला
हिरव्याकंच फांदीवरती
लालचुटुक फुटते पालवी
स्पर्शून जाता झुळूक तिज
लज्जित होत शेंडा हालवी
अंगणी उमलता कलिका
झुळूक भोवती पिंगा घालते
अवचित कालिका फुलता
छेडुनी तिजला पसार होते
हिरव्यागार शेतमळ्यांनी
झुळूक शिवार डोलवते
लोंबीमधल्या बीजांकुरांना
जणू माय होऊनी जोजवते
🖊️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी, सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६
