You are currently viewing कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे १७ जानेवारीला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे १७ जानेवारीला तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ :

कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, जिल्हा ग्रंथालय कुडाळ येथे संपन्न होणार आहे.

कुडाळ तालुका पत्रकार समिती दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असून, यावर्षीही त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार असून ही स्पर्धा तालुकास्तरीय मर्यादित राहणार आहे.

स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी रु. १०००/-, द्वितीय क्रमांकासाठी रु. ७००/-, तृतीय क्रमांकासाठी रु. ५००/- तर उत्तेजनार्थ रु. ३००/- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. ही सर्व पारितोषिके कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी पुरस्कृत केली आहेत.

स्पर्धेसाठी निश्चित नियम व अटी लागू राहणार असून प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी सात मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी खालील पैकी कोणत्याही एका विषयावर वक्तृत्व सादर करायचे आहे –

१) सोशल मीडिया चिंता व चिंतन

२) मोबाईल विधायक की विध्वंसक

३) भारतीय शेतकरी, बळी की राजा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत तालुका पत्रकार समितीचे खजिनदार अजय सावंत (मोबाईल नंबर ९४०५९२४५४८) यांच्याकडे नावे नोंदवावीत. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर (मोबा. ९४२३३०३३४३) तसेच सचिव विठ्ठल राणे (९४०४७५३४४०) यांच्याशी संपर्क साधावा.

तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन आपली वक्तृत्वकला सादर करावी, असे आवाहन कुडाळ तालुका पत्रकार समितीकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा