नगरसेवक देव्या सुर्याजी यांच्या पाठपुराव्याने अवघ्या ७ दिवसांत १० कुटुंबांना स्वच्छ पाणीपुरवठा सुरू
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात नागरिकांना गेल्या दीड महिन्यापासून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. मुख्य बाजारपेठेतून जाणारी नळपाण्याची पाईप लाईन जीर्ण झाल्याने ड्रेनेजचे पाणी त्यात मिसळत होते. पिण्याच्या पाण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने येथील सुमारे १० कुटुंबांना याच दूषित पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे अनेक नागरिक आजारीही पडले होते.
नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान या नागरिकांनी आपली कैफियत मांडली होती. त्यानंतर श्री. देव्या सुर्याजी यांनी तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली होती. प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या ७ दिवसांत त्यांनी या समस्येचा पाठपुरावा करून प्रत्यक्ष काम पूर्णत्वास आणले.
मुख्य बाजारपेठेतून जाणारी जुनी व जीर्ण पाईप लाईन बदलून नवीन नळपाण्याची लाईन टाकण्यात आली. त्यामुळे मंगळवारपासून संबंधित १० कुटुंबांना स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दीड महिन्यांपासून सुरू असलेली दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कामासाठी नागरिकांनी नगरसेवक देव्या सुर्याजी तसेच नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत. मुख्य बाजारपेठेतील ही पाईप लाईन बदलणे मोठे आव्हान होते. यासाठी विशेष प्रयत्न करणारे पाणीपुरवठा विभागाचे श्री. संजय पोईपकर, इंजिनिअर श्री. दिनेश बर्डे, प्लंबर जावेद तसेच सहकार्य करणारे बाजारपेठेतील व्यापारी व नागरिकांचे नगरसेवक श्री. देव्या सुर्याजी यांनी आभार मानले आहेत.
