पोंभुर्ले येथे राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
देवगड :
पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पत्रकारितेतील निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजभान यांचा सर्वोच्च गौरव आहे. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव या पुरस्काराशी जोडलेले असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने पोंभुर्ले येथे आयोजित राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, येत्या सहा वर्षांत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ द्विशताब्दी वर्ष साजरे होणार असून, त्या अनुषंगाने भव्य आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून मंजूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, माजी आमदार प्रमोद जठार, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार आर. जे. पवार, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियांका आवाडे, आकाशवाणीचे माजी संचालक जयु भाटकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची दिंडी काढण्यात आली असून, तिचे पूजन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यस्तरीय विशेष दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना प्रदान करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार पुढील मान्यवरांना प्रदान करण्यात आले —
संपादक शंतनु डोईफोडे (दैनिक प्रजावाणी – नांदेड),
संपादक बसवेश्वर चेणगे (गुंफण दिवाळी अंक – सातारा),
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील (पुणे),
ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण (सातारा),
संपादक प्रकाश कुलथे (दै. स्नेहप्रकाश – श्रीरामपूर),
विजय पालकर (दै. लोकमत – सिंधुदुर्ग),
कार्यकारी संपादक श्रीराम जोशी (दै. नगर टाईम्स – अहिल्यानगर),
शहर प्रतिनिधी अनिल काळबांडे (दै. सकाळ – यवतमाळ),
केंद्रप्रमुख आशिष कदम (मँगो एफ.एम. तथा संपादक, साप्ताहिक वर्तमान).
या सोहळ्याने पत्रकारितेतील मूल्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि निर्भीड लेखन परंपरेचा सन्मान अधिक दृढ केल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
