*डाॅ. संजय जगताप यांच्या ‘सांकव’ पुस्तकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशन*
पिंपरी
मराठी प्रवासवर्णन साहित्याला नवे परिमाण देणारे डाॅ. संजय वसंत जगताप यांचे बहुप्रतीक्षित ७ वे पुस्तक ‘सांकव’ चे प्रकाशन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथील प्रकाशन कट्टा आणि कविकट्टावरती रविवार, दिनांक ०४ जानेवारी २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकाशन कट्टा प्रमुख घनश्याम पाटील, कविकट्टा अध्यक्ष राजन लाखे, सातारा माजी जिल्हाधिकारी, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे, पुणे विद्यापीठातील प्रा. संदीप सांगळे, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड कार्यकारिणी सदस्य किरण लाखे आणि सुनीता बोडस यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘शब्दांतून घडलेलं भारत आणि वैश्विक दर्शन’ अशी संकल्पना मांडणारे हे पुस्तक म्हणजे अनुभवांचा, संवेदनांचा आणि विचारांचा अखंड पूल आहे.
‘सांकव’ या शीर्षकातूनच दोन तीरांना, दोन सागरांना, दोन मनांना आणि दोन स्वप्नांना जोडणारा शब्दांचा सेतू अभिप्रेत आहे. लंडन, बाली, सिंगापूर, दुबई, दिल्ली यांसारख्या जागतिक ठिकाणांपासून ते कोकण किनारा, ताजमहाल, हरिद्वार, हृषीकेश, वैष्णोदेवी, रामेश्वरम, देवप्रयाग या आध्यात्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास लेखकाने अत्यंत जिवंत शैलीत मांडला आहे. निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि शिक्षण यांचा सुरेख संगम हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य ठरते.
डॉ. संजय जगताप हे कवी, लेखक, निवेदक व सहसंपादक म्हणून मराठी साहित्यात परिचित नाव आहे. त्यांची आजवर सहा पुस्तके प्रकाशित आहेत. ‘आई मला जगायचंय…!’, ‘मुलूखावेगळी माणसं’, ‘मानवतेचे पुजारी’, ‘लेखावली’ यांसह अनेक दर्जेदार पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. विविध आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे व शिक्षण परिषदा, साहित्य संमेलने आणि राष्ट्रीय कार्यशाळांतील सहभाग त्यांच्या लेखनाला व्यापक दृष्टिकोन देतो. राज्य ग्रंथालय पुस्तक निवड समितीवर सदस्य, राज्यस्तरीय जीवन शिक्षण मासिक संपादन सदस्य, राज्यस्तरीय शैक्षणिक चित्रपट परीक्षण समितीवर डाॅ. संजय जगताप कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये कविता लेखनाची आवड निर्माण करून त्यांनी पाच बालकाव्यसंग्रह प्रकाशित केले आहेत. ‘सांकव’ हे पुस्तक प्रवासाचे जिवंत अनुभव, इतिहासाशी संवाद, अध्यात्माची अनुभूती, ज्ञानाचा अमूल्य साठा आणि निसर्गाचा जवळचा सहवास देणारे असल्याचे प्रकाशकांनी नमूद केले. साहित्य संमेलनात या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद मिळाला
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
