पुणे / चिंचवड :
एक अनोखा, आंतरराष्ट्रीय सावित्रीबाईंचा सन्मान “सावित्रीबाईं फुले जयंती” निमित्त अंनिस ग्रंथदिंडी आणि पिंपरी चिंचवड शाखेतर्फे साजरा झाला. त्यानिमित्त महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये अनुक्रमे प्रा.सुरेखा कटारिया, डाॅ.श्वेता राठोड, अंजली देशमुख, डाॅ.ज्योती शेट्टी, दिपाली पेंडसे कुलकर्णी (अमेरिका) यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री.पेंडसेकाका म्हणाले, अंनिसने “हुतात्मा डाॅ.नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ स्थापन केले. त्या अंतर्गत अश्या प्रकारची व्याखानमाला ह्यावर्षी सुरु करण्याचा मनोदय व्यक्त केला. ते पुढं म्हणाले, अधूनमधून अश्या प्रकारचे कार्यक्रम घेण्यामुळे अंनिस चळवळीला बळकटी येणार आहे”. सर्वच आधुनिक सावित्रीबाईंचा छान परिचय अलका जाधव यांनी करून दिला.
प्रा.सुरेखा कटारिया आणि डाॅ.श्वेता राठोड यानी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृवाची मांडणी, संवाद करत करत अभूतपूर्व पद्धतीने श्रोत्यांसमोर मांडली. सावित्री कालची, आजची व उद्याची याचा लेखाजोखा द्विपात्री नाट्यछटा संवाद यातून सुरेलपणे मांडला. डॉ.श्वेताने तर पोवाडा म्हणून कार्यक्रमांत रंगत आणली.
त्यानंतर दिपाली पेंडसे कुलकर्णी, यांनी अमेरिकेत चालवत असलेल्या “गुरुकुल-माझी फुलपाखरे”च्या माध्यमांतून अमेरिकेतील मराठी कुटुंबातील मुलांचे मराठीचे वर्ग कसे घेतले जातात ह्याची माहिती हसत खेळत मुलाखतीमधून दिली. अमेरिकेत मुलाना मराठी शिकण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. हे सर्व उपस्थितांना आश्चर्यकारक वाटले. अंजली देशमुख अश्या स्वरूपाची बालवाडी देहूरोडला गेली कित्येक वर्ष चालवून संसाराला हातभार लावत आहेत हे सर्वाना कौतुकास्पद वाटले. डाॅ.ज्योती शेट्टी यांनी अध्यक्षीय भाषणांत, स्त्रियांचे शिक्षण किती आवश्यक आहे, यावर भर दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इला पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या आकर्षक शैलींत केले. आभार मिलिंद देशमुख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यांत, बावनकर, सरोज पेंडसे, प्रदीप तासगांवकर, मनिषा चक्रे, इंद्रजित व सर्वच कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता.
