ओबीसी आंदोलन व संविधान बचाव रॅली प्रकरणातील अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द; सुनावणी पुढे सुरू राहणार
कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जून २०२१ रोजी झालेल्या ओबीसी आंदोलन प्रकरणी राज्याचे मत्स्यउद्योग व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात कुडाळ न्यायालयाने पूर्वी जारी केलेले अजामीनपात्र अटक वॉरंट सोमवारी रद्द केले. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचप्रमाणे सन २०२३ मध्ये आचारसंहितेच्या काळात काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅली प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातील अटक वॉरंटही न्यायालयाने रद्द केले आहे.
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग झाल्याचा आरोप ठेवत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली यांच्यासह एकूण ४२ जणांविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
या खटल्यात मंत्री नितेश राणे हे २४ डिसेंबर रोजी अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. मात्र सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार नितेश राणे यांच्यासह सर्व ४२ आरोपी प्रथम वर्ग न्यायालयात हजर झाले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी आरोपींना दोष कबूल आहे का, अशी विचारणा केली असता सर्वांनी दोष नाकारला. त्यानंतर मंत्री नितेश राणे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सन २०२३ मध्ये आचारसंहितेच्या काळात काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅली प्रकरणात तारखेला गैरहजर राहिल्याने आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही आमदारांनी सोमवारी कुडाळ येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजेरी लावल्याने त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आली असून या प्रकरणाचीही सुनावणी पुढे सुरू राहणार आहे.
या दोन्ही प्रकरणांत आरोपींच्या वतीने अँड. विवेक मांडकुलकर, अँड. शेखर वैद्य आणि अँड. अविनाश परब यांनी काम पाहिले, तर सरकारी पक्षातर्फे अँड. वैष्णवी ठाकूर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाच्या या आदेशामुळे मंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार प्रविण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती अँड. विवेक मांडकुलकर यांनी दिली.
