You are currently viewing संकल्प
Oplus_16908288

संकल्प

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*संकल्प*

 

नवे वर्ष आल्यावर अनेकजण ‘काहीतरी’करण्याचे ठरवतात. त्या आधी तावा तावाने त्या गोष्टींवर ते मत मांडत असतात. दोन चार दिवस घोषणाबाजी सुरू असते. नव्या दिवसाबरोबर संकल्प सुरू होतो आणि आठ दहा दिवसात तो मोडुनही पडतो.

काही ठरवतात पण सुरूच करत नाहीत.

मग ‘संकल्प’हा चेष्टेचा विषय बनतो.

‘वेळ होत नाही…. जमत नाही..’इ. कारणे सांगितली जातात.

परंतु संकल्प हा काही चेष्टेचा विषय नाही.

आपल्याला जमेलच आणि कोणाला तरी फायदा होईल, हित साधले जाईल असं एखादे काम सातत्याने करणे म्हणजे संकल्प.

आधी जमत नाही तर ठरवूच नये. स्वत:ची समर्थता बघुनच सोपा संकल्प ठरवावा, जो कोणालातरी ऊपयुक्त ठरेल.एकदा ठरवलाच तर ‘… प्राण जाय पर वचन न जाय..’या कठोर वृत्तीने तो पार पाडावा. त्याची चेष्टा होऊ देऊ नये.

संकल्प म्हणजे ‘द्रृढ निश्चय’ ही वृत्ती हवीच.

संत म्हणतात हाती नाही बळ… त्याने झाड लाऊ नये.

पण झाड लावायचेच आहे तर असिधारा व्रत म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्याइतके मन दृढ करायला हवे.

या गोष्टीसाठी व्यक्तीजवळ.. ताकद, निष्ठा,श्रद्धा व सातत्य हे हवेच शिवाय संयम व सहनशीलता हवी.

त्यासाठी अति अल्प मुदतीचा एखादा संकल्प गाजा वाजा न करतो जमतोय का?हे चाचपून बघावे.

शक्ती बघुन तपासुन मग संकल्प ठरवावा.

पण इतरांनी चेष्टा करावी असं वर्तन करू नये कारण आज अनेकजण सातत्याने व मोठ्या श्रद्धेने असे संकल्प पार पाडत आहेत त्यांच्या श्रद्धेची व सोशिकतेची यात टिंगल होते.

जिवनसंघर्षात काही वेळा जमत नाही , मग निवृत्तीनंतर साधे सोपे संकल्प करावेत.

यात मनावर बंधन, सोशिकता दृढता याबरोबरच समाजकार्य या सर्वच गोष्टी साधल्या जातात.

मनशांती मिळवण्याआधी मनावर बंधन घालण्याची संवय हवी. मनावर ताबा मिळवता आला तरच मन:शांती मिळेल कि, जी पुढच्या आयुष्यात खुप समाधान ,आनंद व शांती देते. यासाठीच हे संकल्प करायचे असतात.

आपण समाजाचा एक भाग असतो. समाजाच्या सोबतीने मदतीने आपण जिवन घालवत असतो. अशावेळी फुलाची पाकळी म्हणुन जमेल ते समाजकार्य यातुन अनासायस घडते. यासाठी हे संकल्प करायचे असतात हे भान असायला हवे.

गेल्या जन्मीचे काही ऋणानुबंध असतात. ती माणसे या जन्मी परत भेटतात . असा समज आहे. मग या संकल्पातुन असे काही ऋणानुबंध आपण पूरे करू शकतो.

आमच्या शेजारी शांताक्का रहाते. एकटा जीव पण समाजभान अंगी बाणवलेले आहे.

ती दरवर्षी आपल्या घासातला एक घास म्हणजे एक चमचा धान्य… कधी तांदूळ, कधी गव्हाचे पीठ, कधी चहापावडर तर कधी साखर असे डाळी, कडधान्ये, तृणधान्ये , तेलबीया, म्हणजे तीळ, खोबरं इ. साखर गुळ इ. रोज काढुन एका हवाबंद बरणीत साठवते व दर महिन्याला एका श्रमिकाला आपण भेटुन देते.

मी जेव्हा विचारते तेव्हा हंसत म्हणते “अगं!गेल्या जन्मीचे ऋणानुबंध असतात ते पूरे होतात. मला मनाला आनंद शांती व समाधान मिळतं. शांत झोप लागते.मग मनातले वैर, द्वेष, स्वार्थ अस्वस्थता, नैराश्य सारे अंधारात गुडूप होते.

आमचा फुलवाला दरवर्षी एका अनाथाश्रमाला दररोज दहा रू. काढुन ठेवायचा संकल्प आज कित्येक वर्ष करतोय‌

तो म्हणतो लोकं देवळात शंभर सुद्धा एकाचवेळी ठेवतात. पण त्याचा ऊपयोग भटजींना … ‘असुनही आणखीन,”असा होतो. अनाथालयात गरज आहे. मुलं चार गोष्टी खातील, वस्त्र मिळेल, चादर अंथरूण मिळू शकेल नाहीतर शिक्षणासाठी होईल पण गरजुंना मदत होईल.

मला हे जे समाधान आहे ते मी बरोबर घेऊन देवाघरी जाईन.

मी स्वत: एक कोणतेही कडधान्य महिन्यातुन दर शनीवारी एका गरजूला असे देत आले आहे. पौष्टिक खाणे त्यांना दिल्याने मला आनंद मिळतो.

खाण्याचेच फक्त नाही तर सोसायटीतले मोरूनाना कोणाचे बॅंकेचे काम, औषधे आणुन देणे, सोबतीसाठी दोन तीन तास बसणे, देवळात रिक्षाने नेऊन आणणे इ. जेष्ठ व्यक्तींची मदत संकल्प म्हणुन पार पाडतात. मोठ्या हुद्द्यावर काम केलेले हे गृहस्थ मुले छान सधन असुनही पंचाहत्तरीनंतरही आपणहुन संकल्पासाठीच करतात.

म्हणतात, “देवाने छान सुखी आयुष्य, ऊत्तम तब्येत दिली आहे तर दुसर्याच्या ऊपयोगी पडावे ना!”

मन शांत रहाते. जगावेसे वाटते. देवाघरी थोडे सत्कृत्य जमा होते. मला आणखी काय हवे या वयात आता,?

बघा म्हणजे हे करतात ते संकल्प अगदी साधे सोपे तर आहेतच पण सातत्याने त्यातुन फार महत्वाचे कार्य होते.

संकल्प जरूर केले पाहिजेत. ते झेपणारे निवडले पाहिजेत त्यातुन कोणाचातरी फायदा, हित साधले गेले पाहिजे. मनाला आनंद शांतता, समाधान मिळाले पाहिजे.

ज्याला हे शिवधनुष्य पेलेल त्याचे सत्कृत्य देवाघरी नोंदले जाईल.

मात्र संकल्पाची चेष्टा, टवाळी करायची संधी इतरांना देऊ नका. त्यातुन अशा निष्ठावंत संकल्प करणार्यांच्या श्रद्धेला धक्का लाऊ नका.

 

अनुराधा जोशी.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा