You are currently viewing रस्त्यांवर शिस्त, तरच जीव सुरक्षित – पालकमंत्री नितेश राणे यांचा स्पष्ट संदेश
Oplus_16908288

रस्त्यांवर शिस्त, तरच जीव सुरक्षित – पालकमंत्री नितेश राणे यांचा स्पष्ट संदेश

‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत देवगड येथे बाईक रॅलीचे उत्साहात उद्घाटन

EV वाहनांचा वापर वाढवा, वाहतूक नियम पाळा – तरुणांना विशेष आवाहन

देवगड :

जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांचे मौल्यवान प्राण वाचवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे ठाम मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि पर्यावरणपूरक धोरणाचा अवलंब केल्यासच सुरक्षित व शाश्वत भविष्य घडू शकते, असे त्यांनी सांगितले.

देवगड येथे ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत आयोजित बाईक रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस रेजिंग डे निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, माजी आमदार अजित गोगटे, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार श्री. पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. भाऊसाहेब लोकेगावकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, व्यसनमुक्ती आणि रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात तरुणांना उद्देशून सांगितले की, दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरणे बंधनकारक आहे. वेगमर्यादा, सिग्नल आणि इतर नियम पाळले नाहीत, तर त्याची किंमत जीवाने मोजावी लागू शकते. पालकांनीही आपल्या मुलांमध्ये वाहतूक नियमांची जाणीव निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पर्यावरण संरक्षणासाठी इलेक्ट्रिक (EV) वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी जिल्ह्यातील अपघातांची कारणे स्पष्ट करताना बेजबाबदार वाहनचालना आणि वेगमर्यादा न पाळणे हे मुख्य कारण असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नियम माहितीपुरते न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणण्याचे आवाहन केले.

या बाईक रॅलीच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा, जबाबदार वाहनचालना आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश जिल्हाभर प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा