हत्तीप्रश्नावर राजकारण नको, सर्वांनी एकत्र यावे
– गणेशप्रसाद गवस
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील हत्तीप्रश्नावरून विरोधकांकडून शिवसेना (शिंदे गट)वर होत असलेल्या टीकेला तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी टीका करण्यापेक्षा वास्तव लक्षात घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
गवस म्हणाले की, दोडामार्ग तालुक्यातील हत्तींचा प्रश्न आजचा नसून सन 2002 पासून हा प्रश्न कायम आहे. आतापर्यंत सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारने या समस्येवर विविध उपाययोजना केल्या, मात्र अपेक्षित यश कोणालाही मिळालेले नाही. त्यामुळे या प्रश्नासाठी केवळ आम्हालाच दोषी धरून टार्गेट करणे योग्य नाही. हत्तीमुक्त दोडामार्ग तालुका व्हावा यासाठी आमचे शंभर टक्के प्रयत्न सुरू असून, या जबाबदारीतून आम्ही कधीही पळ काढणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
ओंकार हत्ती पकड मोहिमेबाबत न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले असून, हत्तीला पकडू नये व त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडावे, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत, असेही गवस यांनी सांगितले. मात्र काही हत्तीप्रेमी दोडामार्ग तालुकाच हत्तींचा नैसर्गिक अधिवास असल्याचे सांगत असल्याने आम्ही त्याला ठाम विरोध करतो. आज जर आपण गप्प बसलो, तर उद्या ‘हत्ती दोडामार्गचेच आहेत’ असा मुद्दा पुढे करून केवळ नुकसानभरपाई देण्याचे आमिष दाखवले जाईल आणि हा प्रश्न कायमचा तालुक्याच्या माथी मारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या एकमेकांवर टीका करण्यासाठी अनेक मुद्दे असतील, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्याचे भवितव्य आणि नागरिकांची सुरक्षितता आहे. हत्तींच्या उपस्थितीमुळे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. सरकारकडूनही अपेक्षित यश मिळालेले नाही, याची आम्हाला जाणीव आहे. तरीही हा प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे आवाहन गणेशप्रसाद गवस यांनी केले.
