स्थानिकांशी थेट संवाद; रोजगार, पर्यटन व विकासाला चालना देण्याचा पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास
सिंधुदुर्गनगरी :
शिरोडा–वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात निर्माण झालेल्या शंका, प्रश्न व चिंतांचे निरसन करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट स्थानिकांशी संवाद साधत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर चर्चा करत त्यांचे समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, शिरोडा–वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि परिसराचा सर्वांगीण आर्थिक विकास साधला जाईल. “जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवला जाणार असून, स्थानिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भविष्यातही विकासात्मक निर्णय घेताना स्थानिक नागरिकांच्या सूचना, अपेक्षा आणि अडचणी लक्षात घेऊनच पुढील पावले उचलली जातील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीत आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माजी आमदार राजन तेली, जयप्रकाश चमनकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिकांचा विश्वास संपादन करून विकासाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न या संवादातून स्पष्टपणे दिसून आला.
