किल्ले विजयदुर्ग येथे १ जानेवारीला भव्य दीपोत्सवाचे आयोजन
विजयदुर्ग
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ (रजि.) यांच्या वतीने दि. १ जानेवारी २०२६ रोजी ऐतिहासिक किल्ले विजयदुर्ग येथे “किल्ले विजयदुर्ग दीपोत्सव” या भव्य आणि प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि शिवकालीन वारशाला उजाळा देणारा हा कार्यक्रम विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि देशभक्तीपर उपक्रमांनी नटलेला असणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ३ वाजता विजयदुर्ग बंदर जेटीवर सर्व शिवप्रेमी मंडळांच्या आगमनाने होणार असून मान्यवर पाहुणे व सहभागी मंडळांचे स्वागत करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी मिरवणुकीस प्रारंभ होईल. ढोल-ताशांच्या गजरात व विजयदुर्ग माध्यमिक विद्यालयाच्या लेझीम पथकाच्या तालासुरात ही मिरवणूक किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे.
संध्याकाळी महिलांच्या हस्ते महाराजांची पालखी हनुमान मंदिरासमोरील स्टेजवर विराजमान होणार असून शिवरायांची आरती, तसेच “एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवा सैनिकांसाठी” हा श्रद्धांजलीपर कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मशाली प्रज्वलन करून पालखी भवानी माता मंदिर व दरबार हॉलकडे मार्गस्थ होईल. दरबार हॉलमध्ये महाराजांना मानवंदना देण्यात येणार असून जि. प. प्राथमिक शाळा, रामेश्वर यांचा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
रात्री मुख्य रंगमंचावर पालखी विराजमान झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व सहभागी शिवप्रेमी मंडळांचा सन्मान करण्यात येईल. रात्री ९ वाजता म्युझिक लव्हर्स, नवी मुंबई प्रस्तुत “माझ्या राजा रं!” ही शिवकालीन व देशभक्तीपर गीतांची संगीतमय मैफिल रंगणार आहे.
या दीपोत्सवाला मा. तृप्ती धोडमिसे (सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी) व मा. अतुलजी रावराणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून शिवकालीन आरमारी जहाजाची प्रतिकृती (सेल्फी पॉईंट) तसेच रो-रो बोटची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, किल्ले संवर्धनाच्या दृष्टीने सोमवार दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ, गड-किल्ले संवर्धन संस्था, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ व शिवप्रेमी मंडळांनी मारुती मंदिराजवळ एकत्र येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
इतिहास, संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचा जागर करणाऱ्या या दीपोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ (रजि.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
