You are currently viewing बदलत्या जीवनशैलीत कोकणची संस्कृती व सकस आहार आरोग्याचे रक्षण करतो : भूषण सावंत 

बदलत्या जीवनशैलीत कोकणची संस्कृती व सकस आहार आरोग्याचे रक्षण करतो : भूषण सावंत 

दोडामार्ग : लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालय, दोडामार्ग येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रम संस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “बदलती जीवनशैली व आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या बौद्धिक सत्राच्या अध्यक्षस्थानी व्हाइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष तथा सिंधुदुर्ग न्यूज चे संपादक औभूषण सावंत उपस्थित होते, तर व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालय दोडामार्गचे डॉ.रामदास रेडकर, भिकेकोनाळ ग्रामस्थ श्री.गवस आणि प्राध्यापक संजय खडपकर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात भूषण सावंत यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणात असून येथील संस्कृती व पारंपरिक आहार पद्धती जतन केल्यास बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या अनेक आरोग्य समस्यांपासून आपण दूर राहू शकतो. कोकण हा निसर्गसंपन्न भाग असल्याने येथे पिकणारे धान्य, भाजीपाला, फळे व पाणी हे आरोग्यास अत्यंत लाभदायक आहेत. ज्या भागात ज्या गोष्टी पिकतात, त्याच आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाहीत. बदलती जीवनशैली असली तरी सकस आहार, वेळेवर झोप आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना डॉ. रामदास रेडकर यांनी बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम स्पष्ट केला. आज मोबाईलचा अतिवापर मोठ्या प्रमाणात होत असून त्याचा नकारात्मक परिणाम कुटुंबातील लहान मुलांवर होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर आवश्यक तेवढाच करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच आहाराकडे नियमित लक्ष देणे, वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करणे, व्यायाम व योगा यांचा दैनंदिन जीवनात समावेश करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपण सुदृढ आहोत असा गैरसमज न ठेवता आरोग्य चाचण्या वेळच्या वेळी करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बौद्धिक सत्रास एनएसएसचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलत्या जीवनशैलीत आरोग्य जपण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाल्याने स्वयंसेवकांमध्ये सकारात्मक जागृती निर्माण झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा