You are currently viewing डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणी आरोपी अटकेत

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणी आरोपी अटकेत

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणी आरोपी अटकेत

सिंधुदुर्ग सायबर पोलिसांचे मोठे यश; १२ लाखांची संपूर्ण रक्कम गोठवली

सिंधुदुर्ग प्रतिनिधी

कणकवली पोलीस ठाण्यात दाखल डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून अटक केली आहे. या प्रकरणात फिर्यादीची तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती. व ही रक्कम गोठविण्यात आली आहे. डिजिटल फसवणुकीविरोधात सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता व कार्यक्षमता नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली आहे.

कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 323/2025 भा.न्या.सं. 2023 चे कलम 318(4), 3(5) सह आयटी अ‍ॅक्ट 66 क, ड अन्वये दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत संशयित आरोपीचा माग काढला. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे रवाना करण्यात आले. तेथे सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता (वय 33, मूळ रा. गोमरिया, ता. हाटा, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले.

आतापर्यंतच्या तपासात सायबर पोलिसांनी फसवणुकीची संपूर्ण १२ लाख रुपयांची रक्कम १०० टक्के गोठवण्यात यश मिळवले आहे, ही या कारवाईतील अत्यंत महत्त्वाची बाब ठरली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोउनि गणेश क-हाडकर, पोहेकॉ योगेश सातोसे, पोहेकॉ सागर भोसले, पोकों स्वप्निल तोरस्कर यांचा समावेश होता. तसेच सायबर पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदारांनी विशेष सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा