शिवसेना–मनसे युतीच्या घोषणेचा वैभववाडीत जल्लोष
वैभववाडी
मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख मा. राज ठाकरे यांनी शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या ऐतिहासिक घोषणेनंतर वैभववाडी चौकातही जल्लोषाचे दृश्य पाहायला मिळाले. शिवसेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके वाजवून, जोरदार घोषणा देत आणि आनंदोत्सव साजरा करत आपला उत्साह व्यक्त केला.
“शिवसेना–मनसे युती जिंदाबाद”, “मराठी एकीचा विजय असो” अशा घोषणांनी वैभववाडी चौक दणाणून गेला.
या वेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत, या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे पर्व सुरू होईल आणि मराठी माणसाची ताकद अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. वैभववाडी चौकात झालेल्या या उत्स्फूर्त जल्लोषामुळे परिसरातील नागरिकांचेही लक्ष वेधले गेले.
या आनंदोत्सवाच्या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिंदे, मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे, मनसे तालुका अध्यक्ष महेश कदम, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण,शिवसेना तालुका सचिव गुलजार काझी, विभाग प्रमुख यशवंत गवाणकर, स्वप्नील रावराणे, दीपक पवार, ओमकार इस्वलकर, श्री शिवाजी पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना–मनसे युतीमुळे मराठी अस्मितेला नवे बळ मिळेल, असा सूर यावेळी उपस्थितांमधून व्यक्त होताना दिसून आला.
