You are currently viewing ऐक माणसा…
Oplus_16908288

ऐक माणसा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांच्या “ऐक माणसा” या कवितेचे अप्पासाहेब पवार यांनी केलेले हृद्य रसग्रहण..…*

 

 

*ऐक माणसा…*

 

सुधर सुधर रे सुधर माणसा सवयी चांगल्या लावून घे

जगणे मरणे नाही हाती जिणे चांगले निवडून घे

देवाघरचे वाण आपुले बट्टा त्याला लावू नको

घरादाराची राखरांगोळी सट्टा असा खेळू नको…

 

कशास प्यावी दारू राजा मरण ओढवून का घेतो

परणून आणली नवरी म्हणूनी छळवाद का मांडतो..

उघड्यावरती घरदार रे कुत्रेही विचारत नाही

कवडीमोल रे होते आयु झिजून मरते मग आई…

 

वाताहत रे मुले लेकरे भविष्य अंधारी जाते

भाऊबंधही दूर दूर रे उरत नाही मग नाते

जो तो टाळतो दूर मग जातो दोष तयांचा सांग बरे

तुला वाटते मीच बरोबर माझेच सारे आहे खरे..

 

सरळ वागणे सरळ चालणे समाज मग माने त्यास

नीतिने चालता अडथळे भले कितीही हो त्रास

नीतिचा मार्ग असो कठीण रे कधीच त्याला सोडू नये

देव परीक्षा घेतो घेऊ दे मनी नसावी कोणती भये…

 

चोऱ्यामाऱ्या उचलेगिरीने दररोज वाढते बघ पाप

समाधान ते खोटेनाटे रोजच डोक्याला ताप

काय मी करतो कळते आपणा मोठेपणाला भुलू

नये

जे नाही आपले ते घेऊन खोटेपणा तो मिरवू नये..

 

प्रा.सौ.सुमती पवार

 

 

रसग्रहण व समीक्षा कवितेचे नाव :ऐक माणसा.

 

ऐक माणसा या कवितेमध्ये जागतिक सुप्रसिद्ध कवयित्री प्राध्यापक सौ. सुमती पवार यांनी विश्वातील अखंड मानव जातीला उद्देशून त्यांना जीवनाचा यथार्थ सांगून त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिल्या कडव्यामध्ये त्या म्हणतात हे मानवा हा मनुष्यजन्म चांगलं पुण्य कर्म केल्यावरच मिळतो तेव्हा या मानवी जीवनात तू जरा स्वतःला सुधार, चांगलं आचरण कर,चांगल्या सवयी लावून घे. जन्म आणि मृत्यू हे कोणालाच टळले नाहीत. जो जो जन्म घेणार तो एक दिवशी मरणारच तर हा देह नाशिवंत आहे.शरीर अमर नाही फक्त आत्माच अमर आहे.ईश्वराने आपल्याला हे वरदान दिले आहे ही जी मनुष्य जीवनाची देणगी दिली आहे त्याला काळीमा फासू नकोस, त्याला बट्टा लावू नकोस, वाईट व्यसनाच्या आहारी जाऊन वाईट संगतीत पडून आपल्या संसाराचा सत्यानाश करू नकोस व आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेऊ नकोस किंवा जुगार खेळून आपल्या संसाराची राख रांगोळी करून घेऊ नकोस.

दुसऱ्या कडव्यामध्ये वाईट व्यसन दारूचे लावून आपल्या आरोग्य धोक्यात आणू नकोस आणि मरणाला सामोरे जाऊ नकोस व्यसनाधीन होऊन मरण पत्करू नकोस, प्रेम करून परणून मुलीला आणले तिच्या संग छळू नकोस तिला त्रास देऊ नकोस आणि आपल्या संसाराची धूळधाण करू नकोस तुझ्या जीवनात दारिद्र्य तर पाचवीलाच पुजलेले आहे व्यसनाच्या आहारी जाऊन आपले आरोग्य धोक्यात आणून मरणाच्या वाटेला जाऊ नकोस. जीवन हे अनमोल आहे याची किंमत करता येत नाही, राहायला घर नाही आकाशच छत आहे तेव्हा तुला समाजात मान नाही, आदर नाही, काडी इतकी किंमत तुला कोण देत नाही, कोणीच तुला विचारत नाही तेव्हा या अशा आयुष्याला काहीच अर्थ नाही. जगण्याला काहीच मोल नाही आणि आयुष्य असंच निघून जातं आणि ज्या आईने तुला जन्म दिला तिला चांगलं न सांभाळ केल्या मुळे तुझ्या चिंतेत ती बिचारी आई काळजीने झुरून गेली आणि तुला सोडून गेली.

तिसऱ्या कडव्यात

तुझ्या या अशा वागण्याने तुझी मुलं बाळे, बायकोची दुर्दशा झाली,मुलाबाळांचे भविष्य अंधारमय झालं जीवनात पैसा आहे तर सर्व मित्र नातेवाईक जवळ येतात जसं गुळाला मुंग्या चिकटतात तसं पैसा असल्यावर सर्वजण नातं, मैत्री जोडण्याचा प्रयत्न करतात, पण तुझ्या अशा वागण्यामुळे मित्र, नातलग सर्वजण तुझ्यापासून दूर गेले तुझ्याकडे ढुकूनही पाहत नाहीत, समाजातील माणसं, नातलग, मित्रही तुला टाळतात तुला वाटत असेल की तो त्यांचा दोष आहे पण येथे तर तू चुकतोस खरा दोष त्यांचा नाही तो दोष तुझा आहे. तुला वाटते की मी जे काय करतोय ते बरोबर करतोय, ही जी धारणा तुझी आहे ती साफ चुकीचे आहे, तुझ्या मध्येच दोष आहेत म्हणून तुला समाजात दुर्लक्षित करत आहेत.

चौथ्या कडव्यामध्ये…

जर सरळ प्रामाणिक सदाचारी वागला तर तुला समाजात मान, आदर, सत्कार व प्रतिष्ठा मिळेल जर तू प्रामाणिकपणाने जीवनात आचरण केलेस, जरी कितीही संकटे, वादळे जीवनात आली तरी सत्याचा मार्ग किती कठीण असला तरी सोडू नकोस तेव्हा असं आपल्या मनाला समजावण्याचा प्रयत्न कर. असं समज की देव तुझी परीक्षा घेत आहे त्यासाठी कसलीच भीती वाढवण्याचे कारण नाही देव तुझं चांगलंच करणार आहे पण नीतिमत्ता सोडू नकोस असं कवयित्री आपल्या चौथ्या कडव्यात मानवाला उद्देशून म्हणतात. पाचव्या कडव्यामध्ये त्या पुन्हा मानवाला इशारा करून चेतावणी देतात की दैनंदिन जीवनात दोन नंबरचे धंदे करून चोऱ्या माऱ्या करून दुसऱ्याचे लुबाडून आपल्या पापात भर घालू नकोस आणि आपल्या मनातल्या चिंतेने डोक्याला ताप करून घेऊ नकोस, मनाल ताण देऊ नकोस, गडगंज संपत्ती गोळा करून खोटे समाधान मानून आपल्या चिंतेत भर घालून आपल्या बुद्धीला त्रास देऊ नकोस. बुद्धिभ्रष्ट होऊ नकोस.तुला वाटते की मी जे काही जीवनात करतोय ते सर्व मला कळतंय असं तुला वाटतंय, पण कळतंय पण वळत नाही अशी अवस्था तुझी झाली आहे तेव्हा मनुष्य जन्माचा मोठेपणाला विसरू नकोस. आपली समाजातील प्रतिष्ठा विसरू नकोस या प्रतिष्ठेला मातीमोल करू नकोस आपल्या मान, आदर,प्रतिष्ठेला विसरू नकोस. साधं सरळ जीवनाचे ध्येय म्हणजे जे आपलं नाही ते लुबाडून घेऊन मीच केलं, मीच कमावले असं खोटं सांगून समाजापुढे आपला टेंबा मिरवू नकोस व आपली मिजास दाखवू नकोस असं प्राध्यापक सुमती पवार नाशिक यांनी आपल्या कवितेत जीवनाचा यथार्थ मांडला आहे. कविता प्रबोधनकारक जनजागृती करणारी आहे सुंदर उत्कृष्ट आणि अप्रतिम रचना केली आहे. कवितेच्या एक एका कडव्यामध्येच वह्याची दोन पान भरतील इतका अर्थ दडलेला आहे मला जेवढे आकलन झाले तेवढे मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आपला अभिप्राय जरूर कळवा मॅडम… धन्यवाद.

 

लेखक ..

अप्पासाहेब पवार: कवी, कथा, कादंबरीकार, पनवेल नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा