आशीर्वाद, पुष्पवृष्टी आणि सर्वपक्षीय उपस्थितीत सावंतवाडी नगरपरिषदेत नव्या नेतृत्वाची सुरुवात
सावंतवाडी :
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी आज औपचारिकरीत्या पदभार स्वीकारला. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज व शिवरामराजे भोंसले यांचा आशीर्वाद घेत त्यांनी नगरपरिषद सभागृहात प्रवेश केला.
पदभार स्वीकारताना नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. फुलांच्या पायघड्या, पुष्पवृष्टी आणि अभिनंदनाच्या घोषणांमध्ये युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांचे आगमन झाले. लोकमान्य टिळक सभागृहात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक संजू परब यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. निवडणुकीनंतर विरोधकाची भूमिका निभावण्याची घोषणा झाल्यानंतर प्रथमच सेना-भाजपचे नगरसेवक सभागृहात समोरासमोर आले. या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली असता, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी हा प्रशासकीय कार्यक्रम असल्याची जाणीव करून देत वातावरण शांत केले. यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले. उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर यांनीही युवराज्ञींना शुभेच्छा दिल्या, तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुंडलिक दळवी उपस्थित होते.
निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपानंतर प्रथमच सावंतवाडीत सर्व पक्षांचे नगरसेवक एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, भाजपचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, ॲड. अनिल निरवडेकर, प्रतिक बांदेकर, वीणा जाधव, मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, दुराली रांगणेकर, सुनिता पेडणेकर तसेच माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, विनोद राऊळ, दिलीप भालेकर, चंद्रकांत जाधव, माजी नगरसेविका भारती मोरे, संजय पेडणेकर, क्लेटस फर्नांडिस आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या नेतृत्वाच्या या सुरुवातीमुळे सावंतवाडीच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
