मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा लेडी जादुगार आणि मालवण तालुक्यातील तारकर्ली गावची सुकन्या सलोनी पांडुरंग धुरी हिने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवत जिल्ह्याचे व तारकर्ली गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. केरळ येथे नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या मॅजिक्सो नॅशनल मॅजिक कॉम्पिटिशनमध्ये सलोनीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
सलोनी ही सिंधुदुर्ग पोलीस दलातील कर्मचारी, तारकर्लीचे सुपुत्र तसेच नाट्य अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व जादूगार पांडुरंग धुरी यांची कन्या आहे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून, म्हणजेच इयत्ता दुसरीत असतानाच तिने वडिलांकडून जादूचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जादूच्या क्षेत्रात प्रवेश केला.
सध्या सलोनी मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयात एस. वाय. बी.ए. या वर्गात शिक्षण घेत आहे. आतापर्यंत तिने लहान-मोठे मिळून २०० पेक्षा अधिक जादूचे प्रयोग सादर केले आहेत. मुंबईतील टीव्ही स्टार जादूगार अतुल पाटील तसेच पुणे येथील बॉडी-लोड स्पेशालिस्ट जादूगार अक्षया यांच्याकडे ती जादूचे पुढील प्रशिक्षण घेत आहे.
यापूर्वी २०२३ मध्ये पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादूगार परिषदेत तिने तृतीय क्रमांक, तर मे २०२५ मध्ये पुण्यातीलच राष्ट्रीय जादूगार स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता. याशिवाय जादू विशारद व जादूभूषण या मानाच्या पुरस्कारांनीही तिला गौरविण्यात आले आहे.
वडिलांप्रमाणेच समाजसेवेचा वारसा जपत, शाळा व विविध संस्थांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी चॅरिटी शो करण्याचा संकल्प सलोनीने केला आहे. जादूचे प्रयोग व विविध स्पर्धांमधून मिळणाऱ्या पुरस्कारांद्वारे संस्थांना मदत करण्याचा प्रयत्न ती सातत्याने करणार असल्याचेही तिने सांगितले आहे.
