रत्नागिरी:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मारुती मंदिर रत्नागिरी तर्फे बाया कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त “Paint your Passion” ही स्पर्धा घेण्यात आली होती त्याचा बक्षीस वितरण समारंभ पटवर्धन हायस्कूल च्या कीर सभागृहामध्ये १३ डिसेंबरला उत्साहात आणि रंगतदार वातावरणात संपन्न झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ८ शाळांमधून एकूण 155 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी भविष्यातील रत्नागिरी, पर्यावरणपूरक घर, माझ्या घरातील आवडता कोपरा, असे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वरील विषयांवर चित्रे काढून आपली सर्जनशीलता प्रभावीपणे मांडली.
सहभागी शाळांमधून कला शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे प्रकल्प प्रमुख श्री.मंदार सावंतदेसाई उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.स्वप्नजा मोहिते व आर्किटेक्ट मकरंद केसरकर यांनी उपस्थित राहून बक्षीस पात्र प्रथम , द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच उत्तेजनार्थ क्रमाकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रत्येकी सहभागी शाळांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचेही कौतुक केले.डॉ .स्वप्नजा मोहिते यांनी कला आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी आपले विचार मांडले व केसरकर सर यांनी कला आणि कलेमधून करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी माहिती सांगितली. पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांमधील कल्पकता, रंगसंगती आणि संदेशवहनाचे कौतुक केले.
विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि विशेष पारितोषिके देण्यात आली. तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसाद शेवडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर्किटेक्ट कविता सावंत यांनी केली व आभारप्रदर्शन सिद्धी करंदीकर यांनी केले. आयोजकांनी पुढील वर्षी स्पर्धा अधिक मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
