*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हरिभगिनी वृत्त – फटका*
( मात्रा ८|८|८|६ )
मना जाण रे मनोबोध तू समर्थ शिकवण जाणावी
मना चांगले वाग नेटके विवेक संगत राखावी ||
नको हाव रे धनद्रव्याची गरजेपुरते जोडावे
समाधान हे मनात असते व्यर्थ धावणे सोडावे ||
अती क्रोध अन अती मस्करी हानीकारक बघ ठरते
नियम बंधने तोडता मना संसाराचे सुख सरते ||
व्यसने घातक रोग शरीरा त्यांची संगत धरू नको
देह संपदा मूल्यवान ती हेळसांड तू करू नको ||
झाले गेले विसरुन सारे जिवलगांसवे बंध हवे
आयुष्याचे रूप देखणे बनत जातसे नवे नवे ||
मृदू बोलणे नित्य असावे कथन करावे प्रेमाने
माणसातल्या देवत्वाला वंदन करणे विनयाने ||
मायपित्यांची सेवा करणे कर्तव्याला चुकू नको
पाठीराखा देव होतसे नामस्मरणा टाळु नको ||
*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*
