सावंतवाडी :
शिवसेनेच्या ओबीसी आणि डीएनटी जिल्हाप्रमुखपदी सुदन कवठणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाची दखल घेत तसेच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्ष बांधणीसाठी केलेल्या परिश्रमांचा विचार करून ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती एका वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.
या निवडीमुळे ओबीसी आणि भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना आता खऱ्या अर्थाने वाचा फुटेल, असा विश्वास शिवसैनिकांतून व्यक्त होत आहे. कवठणकर यांच्या खांद्यावर हिंदुत्वसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्ववादी विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसमावेशक विकासाचा दृष्टिकोन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.
या नियुक्तीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, शिवसेना ओबीसी–डीएनटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर पेणकर यांनी सुदन कवठणकर यांचे अभिनंदन केले आहे. “सुदन कवठणकर यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला नवी उभारी मिळेल आणि सामाजिक कार्याला गती येईल,” असे मत व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ही नियुक्ती माजी मंत्री दीपक केसरकर आणि जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या विशेष शिफारशीवरून झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
