ओसरगाव येथे लघु पाटबंधारे विभागाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
कणकवली
ओसरगाव येथील लघु पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या छोट्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या इमारतीचे उद्घाटन सहाय्यक अभियंता श्रेणी–एक श्री. आकाश जाधव यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या कार्यक्रमास गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानिमित्त ब्राह्मण भोजनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत, संबंधित अधिकाऱ्यांचे व नियोजनकर्त्यांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी ग्रामस्थांनी भविष्यात ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय तसेच लघु पाटबंधारे विभागाची स्वतंत्र इमारत व विश्रामगृह उभारण्यात यावे, अशी मागणी अधिकाऱ्यांसमोर मांडली. ओसरगाव तलाव एकीकडे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत असताना, दुसऱ्या बाजूला सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत, असा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ओसरगाव तलावाच्या विकासामुळे गावाचा चेहरा मोहरा बदलणार असून, स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. या विकासासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचा शेवट ग्रामदैवत श्री लिंग माऊली माते की जय या घोषणांनी उत्साहात झाला.
