डॉक्टर संघटनांचा निषेध; कणकवलीत २४ तास खासगी रुग्णालये बंद
उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ
कणकवली :
शहरातील नागवेकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत डॉक्टर संघटनांनी आज कणकवलीत २४ तासांचा खासगी रुग्णालयांचा बंद पुकारला आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी रुग्ण तपासणी सेवा बंद ठेवल्याने रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र आहे.
खासगी रुग्णालये बंद असल्याने कणकवली तालुक्यासह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. परिणामी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असून, उपलब्ध आरोग्य सुविधांवर ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात वेळेवर, योग्य आणि दर्जेदार उपचार मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून रुग्णसेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा सतर्क झाली असून सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी रुग्णसेवेत व्यस्त असल्याचे चित्र आहे.
