You are currently viewing प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे दुसरे अंग

प्रवासी महासंघ हा ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे दुसरे अंग

डॉ.विजय लाड- (अध्यक्ष, ग्राहक पंचायत महाराष्ट्र)
प्रवासी महासंघाच्या राज्यातील २६ जिल्ह्यांच्या निवडी जाहीर.

वैभववाडी

महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या २६ जिल्ह्यांच्या अध्यक्ष व संघटक यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी श्री. तेजस साळुंखे तर जिल्हा संघटकपदी श्री.जितेंद्र पिसे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे ही संघटना प्रवासी ग्राहकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी १९८९ पासून राज्यात कार्यरत आहे. या संघटनेच्या माध्यमातून प्रवासी ग्राहकांचे प्रबोधन करण्याबरोबरच समस्यांचे निराकरणही केले जाते. अशा या राज्यव्यापी कार्यरत असणाऱ्या संघटनेची राज्यव्यापी ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. प्रवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहा विभागातील एकूण २६ जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि संघटक पदांची निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रवासी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री. रणजीत श्रीगोड, प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड उपस्थित होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ या दोन्ही संघटना ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या असून त्या दोन्ही सहयोगी संघटना असल्याचे डॉ.विजय लाड यांनी सांगितले. स्त्री आणि पुरुष हे लक्ष्मीनारायणाच्या रूपात कार्य करतात. सामाजिक विधायक कामात महिलांचा सहभाग कसा वाढला पाहिजे याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या संघटिका सौ. मेघाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. प्रवासी महासंघाची कार्यपद्धती समन्वयातून संवाद आणि संवादातून ग्राहक कल्याण ही पद्धती असून साधकांनी आपली कार्यपद्धती अवलंबली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन प्रवासी महासंघाचे उपाध्यक्ष श्री.अरुण वाघमारे यांनी केले. प्रवासी महासंघ हे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. सर्वांनी समन्वयाने काम करावे आणि दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी असणारा “प्रवासी दिन” तिळगुळ वाटप समारंभ आणि वाहनचालकांचा सन्मान करून राज्यातील प्रत्येक आगारात साजरा करावा असे आवाहन समारोप करताना अध्यक्ष श्री.रणजित श्रीगोड यांनी केले. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत सागर रणदिवे यांनी केले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राज्याचे सचिव प्रा.गुरूनाथ बहिरट यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोद बापट यांनी केले. यावेळी महाराष्ट्रातील २६ जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि संघटक पदाच्या नियुक्त्या अध्यक्ष रणजित श्रीगोड, उपाध्यक्ष अरुण वाघमारे, महासचिव नंदकुमार कोरे व सचिव प्रा.गुरुनाथ बहिरट यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. तेजस प्रकाश साळुंके-वैभववाडी यांची अध्यक्षपदी आणि संघटकपदी श्री. जितेंद्र वसंत पिसे-देवगड यांची निवड एकमताने करण्यात आली. सर्व निर्वाचित अध्यक्ष आणि संघटक यांचे राज्य कार्यकारिणीतर्फे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. या बैठकीस ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संघटक सर्जेराव जाधव, सदस्य प्रमोद कुलकर्णी, श्यामकांत पात्रीकर, कल्पना तिवारी आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यातील सर्व नवनियुक्त अध्यक्ष आणि संघटक उपस्थित होते. या निवडीबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − thirteen =