*वैभववाडी महाविद्यालयात Advanced Excel व OriginLab वर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न*
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागामार्फत PM–USHA अंतर्गत Advanced Excel आणि OriginLab या विषयावर दि. १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय हॅण्ड्स-ऑन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा उद्देश विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक डेटा विश्लेषण, ग्राफिकल सादरीकरण, कर्व-फिटिंग व एरर अॅनालिसिस याबाबत प्रत्यक्ष कौशल्ये विकसित करणे हा होता. सद्यःस्थितीत संशोधन, उद्योग व स्पर्धात्मक क्षेत्रात डेटा विश्लेषणाचे महत्त्व वाढत असल्याने या प्रशिक्षणाला मोठा प्रतिसाद लाभला. महाविद्यालयांतील विज्ञान शाखेचे विद्यार्थी, संशोधनाची आवड असलेले विद्यार्थी व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मिलिंद कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक, R.D. & S.H. National College, मुंबई, हे होते. त्यांनी Advanced Excel मधील प्रगत फंक्शन्स, डेटा सॉर्टिंग, सांख्यिकी विश्लेषण, ग्राफ तयार करण्याच्या पद्धती तसेच OriginLab सॉफ्टवेअरच्या सहाय्याने व्यावसायिक दर्जाचे वैज्ञानिक ग्राफ व कर्व-फिटिंग यांचे सविस्तर प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले.
प्रशिक्षक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री.सज्जनकाका रावराणे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व डेटा साक्षरता विकसित होणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा विचार अधिक सुसूत्र होतो आणि भविष्यातील संशोधनासाठी सक्षम पिढी घडते, असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, तसेच भौतिकशास्त्र विभागातील प्रा. ढेरे व डॉ.शिरगांवकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. ए. चौगुले यांनी केले.
